HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामधील राज्याच्या सहभागी नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु !

मुंबई | दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले. सर्व धर्माच्या प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे. या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे असे सांगितले. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

लॉकडाऊन उठविल्यानंतरचे नियोजन

लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर नेमके कशा प्रकारे नेमके राज्य सरकारांनी कशी परिस्थिती ठेवावी याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितले. यावर पंतप्रधानांनी राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातीळ स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या सूचना केल्या.

३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, भोजन

परराज्यातील श्रमिक, कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेता असून ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेसचे भोजन देत असल्याची माहिती यावेळी दिली. त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही यातील तज्ञ , डॉक्टर नियुक्त केले आहेत, असे सांगितले. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना देखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मोठ्या प्रमाणात आयसोलेशनसाठी तयारी

पुढील परिस्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे. महानगरपालिकेच्या ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग मधून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करीत आहोत. नव्या प्रोटोकॉलप्रमाणे ( मानकाप्रमाणे ) आम्ही लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचे देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण करीत असून त्यासाठी पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालये, ताब्यात घेतले आहेत. पुढे गरज पडल्यास तयारी असावी म्हणून एखादी मोठी जागा निश्चित करून याठिकाणी आयसोलेशन व क्वारंटाईन सुविधा उभारण्याचे नियोजन आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आमचे पूर्ण लक्ष आम्ही कोरोनाचा प्रसार थांबविण्यावर केंद्रित केले असून पूर्वी चाचणी कमी होत असल्याने रुग्णांची संख्या कमी होती, त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांना देखील चाचणीची परवानगी दिल्याने आणि त्यांचे दोन तीन दिवसांचे निदान एकदम एकत्रितरीत्या हाती येत असल्याने रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे असे चित्र दिसते. मात्र या रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई शहरातील महानगरपालिका रुग्णालयात आयसोलेशनसाठी केवळ २८ रुग्णशय्या होत्या त्यामध्ये आता २१०० पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

कोविड रुग्णालय

सध्या एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात १५००खाटांची सोय फक्त कोविड १९ साठी निर्माण करण्यात आली असून येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारत आहोत असेही ते या कॉन्फरन्समध्ये म्हणाले.

वैद्यकीय उपकरण उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे

पीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची तर गरज आहेच. स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांचे उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो!

News Desk

पृथ्वीतलावरून मानवाच्या शेवटाची सुरुवात

News Desk

टोल नाक्यांवर न्यायाधीश आणि व्हीआयपींना स्वतंत्र लेन | मद्रास उच्च न्यायालय

News Desk