HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये क्लबवर छापा; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह ५० जणांवर गुन्हा दाखल!

बीड । बीड जिल्ह्यात जुगाराच्या अड्ड्यावर छापे मारी सुरू आहे यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला आहे. या घटनेने सबंध जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीड शहरापासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा परिसरातील राजेंद्र तुकाराम मस्के यांच्या जागेतील जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी काल (28 डिसेंबर) रात्री छापा टाकला. यावेळी 48 जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार, मोबाईल असा 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 48 जण पोलिसांच्या ताब्यात असून इतर दोघे फरार असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे. राजेंद्र मस्के यांचाही आरोपीत समावेश असल्याने एफआरआयमध्ये त्यांचे नाव आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

राजेंद्र मस्के यांच्या चऱ्हाटा फाटा येथील जागेत आलिशान क्लब सुरू होता. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. या क्लबवर छापा मारला असता 48 जुगाऱ्याना ताब्यात घेतले, तसेच त्यांच्याकडून दीड लाख रोख, 25 व्हीआयपी गाड्या, मोबाईल असा 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींनी ‘हंस क्लब’ हा राजेंद्र मस्के यांचा असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे मस्के यांच्यासह 50 जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून 48 जण पोलिसांच्या ताब्यात असून दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

“हे केवळ एक षडयंत्र”

तर राजेंद्र मस्के यांच्याशी दूरध्वनीद्वारे बातचीत केली असता मस्के म्हणाले, “संबंधित जागा ही माझी नसून मोठे बंधू यांच्या मालकीची आहे. त्यांनी ती जागा भाडेतत्वावर दिली होती. त्यात माझा काहीही संबंध नाही.” तसेच हे केवळ एक षडयंत्र असून सूडबुद्धीने माझे नाव गोवण्याचे काम केले जात असल्याचा खुलासाही राजेंद्र मस्के यांनी केला आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमके कोणत्या टोकाला जाते आणि आणखी कोणा कोणाची नावे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकजवळच्या भीषण अपघातात दोघे ठार

News Desk

ईडीने मालमत्ता जप्त करणे म्हणजे संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न! – जयंत पाटील

Aprna

आता भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे – नवाब मलिक

News Desk