HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी पाट्यांचं श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचंच! – राज ठाकरे

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर काल (१२ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या या मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक केल्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या निर्णयानुसार अन्य भाषांमध्ये पाट्या लावता येतील, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा लहान असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, मराठी पाट्यांचा मुद्दा यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांसाठी आंदोलनही केलं होतं. त्यानंतर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर राज ठाकरेंनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठी पाट्यासंदर्भात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाकरिता राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी आंदोलन करावं लागू नये, अशी खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत, या निर्णयाचं श्रेय हे सरकारचं नसून महाराष्ट्र सैनिकांचं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

काय म्हंटलं राज ठाकरेंनी ?

ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.

काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.

आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा.

ह्यात आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका! पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिकांचं मनःपूर्वक अभिनंदन.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर पंजाबमध्ये लागू केलेला ‘मार्शल लॉ’ म्हणजे काय ?

swarit

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता

Aprna

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांची राज्यपालांसोतबची भेट तुर्तास रद्द

News Desk