HW News Marathi
Covid-19

कोरोना कमी, इशारे कायम अशीच यापुढे जगाची स्थिती असेल! – सामना

मुंबई | गेल्या वर्षापासून म्हणजे २०२० पासून आपण सगळेच कोरोना या महाभयंकर रोगाशी लढत आहोत. देशात एकीकडे रूग्ण संख्या कमी होत असताना ब्रिटनमधुन नवा कोरोना स्ट्रेन आला. देशात त्याचे रूग्ण आढळले. आणि आता महाराष्ट्रात देखील ८ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढणारी ही बाब आहे. अशात सामनाच्या आजच्या (५ जानेवारी) अग्रलेखात कोरोनापेक्षा अनेक इशारेच देणं सुरू आहे. यावर लेख लिहिला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

गेल्या काही काळात अनेक विषाणूंचा संसर्ग मानवाला प्राण्यांमधूनच झाला आहे. माणसाचे बदललेले राहणीमान, बदललेली जीवनशैली, खाण्याच्या सवयी, ग्लोबल वॉर्मिंगचे पर्यावरणावर झालेले दुष्परिणाम, पशू-पक्ष्यांचे उद्ध्वस्त होणारे नैसर्गिक निवारे यामुळे प्राण्यांपासून असलेल्या विषाणूजन्य आजारांचा धोका माणसाला आता नेहमीच राहणार आहे. ‘बर्ड फ्लू’ आणि ‘डिसीज एक्स’चे घोंघावणारे संकट त्याचेच निदर्शक आहे. कोरोना कमी, इशारे कायम अशीच यापुढे जगाची स्थिती असेल.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. नवीन वर्षाची ही सुरुवात निश्चितच दिलासादायक आहे. मात्र त्याच वेळी दोन इशाऱ्यांनी थोडी चिंता वाढवली आहे. ‘इबोला’ या भयंकर विषाणूचा शोध लावणारे वैज्ञानिक जीन जॅक्स मुयेम्बे तामकूम यांनी ‘डिसीज एक्स’ या नवीन संसर्गजन्य आजाराची भीती व्यक्त केली आहे. हा नवीन विषाणू आणि त्याचा संसर्ग कोरोना विषाणूपेक्षाही भयंकर असेल, असे मुयेम्बे यांनी म्हटले आहे. या रोगाची लागण कांगो या देशात झाल्याची भीती असली तरी दुसरा धोक्याचा इशारा हिंदुस्थानातच मिळाला आहे. राजस्थानात ‘बर्ड फ्लू’चा ऍलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्या राज्यातील झालावाड जिह्यात मृत कावळय़ांमध्ये एका भयंकर विषाणूचे अस्तित्व आढळून आले आहे. त्यामुळेच हा इशारा देण्यात आला आहे. एकटय़ा झालावाड जिह्यातच नव्हे तर जयपूरसह इतरही काही जिह्यांमध्ये शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथेही काही मृत कावळय़ांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू सापडला आहे. केरळमध्येदेखील बर्ड फ्लूचे संक्रमण झाल्याचे उघड झाले आहे. शिवाय परदेशातून देशाच्या विविध भागांत आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांचे मोठय़ा प्रमाणावर होणारे मृत्यूदेखील संशयास्पद ठरले आहेत. किंगफिशर आणि मॅगपाईज या जातीच्या चिमण्यादेखील मरण पावत आहेत.

हा सगळाच प्रकार काळजी वाढविणारा आहे. कोरोनाच्या भयंकर संकटातून आताच आपली मान मोकळी होत आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखविला आहे. कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी राज्य आणि देश पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांत या लसीच्या वापराचा ‘ड्राय रन’ही यशस्वी पार पडला. देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांचा आलेख घटता आणि कोरोनामुक्त होणाऱयांचा आलेख चढता दिसून येत आहे. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे ठप्प झालेले अर्थव्यवहार आणि बाजारपेठांमधील चलनवलन सुरू झाले आहे. पूर्ण ‘अनलॉक’ अद्यापि झालेले नसले तरी देशभरातील व्यापार, व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार बऱ्यापैकी सुरू झाले आहेत.

मागील नऊ-दहा महिन्यांपासून मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भूत आता लसीच्या बाटलीत बंद होईल याचेच हे संकेत आहेत. देशात कोरोनाबाबत असे फिल गूड वातावरण निर्माण होत असताना ‘बर्ड फ्लू’ आणि ‘डिसीज एक्स’ या विषाणू संसर्गाच्या बातम्या सरकार, प्रशासन आणि जनतेच्याही मनाची धडधड वाढविणाऱ्याच आहेत. ‘फिल बॅड’ वातावरण निर्माण करणाऱया आहेत. ‘बर्ड फ्लू’बाबत राजस्थान, मध्य प्रदेश येथील प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. ‘डिसीज एक्स’च्या विषाणूबाबतचे दावे जरी परस्परविरोधी असले तरी कोरोना महामारीचा भीषण अनुभव घेतलेल्या जगाला अशा प्रत्येक इशाऱयांचे ‘ताक’ फुंकूनच प्यावे लागणार आहे.

मुळात गेल्या काही काळात अनेक विषाणूंचा संसर्ग मानवाला प्राण्यांमधूनच झाला आहे. पूर्वीपासून असलेले प्लेग, फ्लूसारखे आजार काय, अलीकडील ‘स्वाईन फ्लू’ काय किंवा आताचा कोरोना काय, या घातक आजारांचे मूळ प्राण्यांमध्येच आहे. माणसाचे बदललेले राहणीमान, बदललेली जीवनशैली, खाण्याच्या सवयी, ग्लोबल वॉर्मिंगचे पर्यावरणावर झालेले दुष्परिणाम, पशू-पक्ष्यांचे उद्ध्वस्त होणारे नैसर्गिक निवारे यामुळे प्राण्यांपासून असलेल्या विषाणूजन्य आजारांचा धोका माणसाला आता नेहमीच राहणार आहे. ‘बर्ड फ्लू’ आणि ‘डिसीज एक्स’चे घोंघावणारे संकट त्याचेच निदर्शक आहे. कोरोना कमी, इशारे कायम अशीच यापुढे जगाची स्थिती असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर ! ॲाक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला मिळाली परवानगी !

News Desk

मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट  – मुख्यमंत्री

News Desk

महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Arati More