HW News Marathi
देश / विदेश

अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार?, सामनातून भाजपवर निशाणा

मुंबई | पश्चिम बंगालच्या विधानसभेचं रण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झालेत. अशातच सामना अग्रलेखातून ममतांना वाघिण संबोधत भाजपवर शरसंधान करण्यात आलं आहे. ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजपची नौका आणखीनच खोल पाण्यात गेली, असं सुचवत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

आपल्या निवडणुका आता खोटेपणा व सहानुभूती या दोन शस्त्रांनीच लढल्या जातात. प. बंगालात दोन्ही बाजूंनीच या शस्त्रांचा खणखणाट सुरु आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना हिंमत असेल तर नंदीग्राममधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान देताच ममता बॅनर्जी यांनी वाघिणीप्रमाणे भक्ष्यावर झेप घेतली व नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणुकीचा अर्ज भरला. अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार? असा सवालही उपस्थित केला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

आपल्या निवडणुका आता खोटेपणा व सहानुभूती या दोन शस्त्रांनीच लढल्या जातात. प. बंगालात दोन्ही बाजूंनीच या शस्त्रांचा खणखणाट सुरू आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना हिंमत असेल तर नंदीग्राममधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान देताच ममता बॅनर्जी यांनी वाघिणीप्रमाणे भक्ष्यावर झेप घेतली व नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणुकीचा अर्ज भरला. अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार? ममतांच्या लंगडय़ा पायास भाजपवाले घाबरले ते त्यामुळेच!

नंदीग्राममध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होत असते. त्यामुळे ममतांची जखम त्यांच्या विरोधकांना जास्तच भारी पडणार आहे. ममता या नंदीग्राम येथून निवडणूक लढत आहेत. त्या नंदीग्राम येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या. त्यानंतर प्रचाराच्या दरम्यान बिरुलिया येथे मंदिरासमोर त्यांच्या गाडय़ांचा ताफा थांबला. कारच्या बाहेर उतरून त्या देवाला नमस्कार करत असताना चार-पाच लोक अचानक धावत आले आणि त्यांनी गरज नसताना दरवाजा ढकलून ममतांना जखमी केले. ममता यांच्या पायास मोठी दुखापत झाली असून त्यांचा पाय प्लॅस्टरमध्ये आहे. हा अपघात नसून विरोधकांनी जाणूनबुजून केलेला हल्ला आहे, असे ममता म्हणत आहेत तर लोकांची सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे.

या अपघाताची सी.बी.आय. चौकशी करा, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केली. ममतांच्या पायाला इजा झाली हे बरोबर. त्यांच्या पायाला प्लॅस्टर पडले हेही खरेच. मात्र त्या प्लॅस्टरच्या सी.बी.आय. चौकशीची मागणी हा प. बंगाल निवडणुकीतील सगळय़ांत मोठा विनोद म्हणावा लागेल. प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला. ममतांच्या पायास पडलेले प्लॅस्टर भाजपच्या किमान दहा-वीस जागा नक्कीच जखमी करू शकते. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात सर्व शक्ती पणास लावली आहे. ममतांची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न सुरू आहे. ममतांचा पक्ष रोज फोडता जात आहे. तरीही ममतांचा प. बंगालातील जोर कायम आहे. प. बंगालातील लढाई ही ममता विरुद्ध नरेंद्र मोदी अशी झाली आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष प. बंगालात काय घडतेय याकडेच लागले आहे. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात ‘माहोल’ गरम केला आहे व प्रत्येक निवडणूक ते असाच माहोल निर्माण करून जिंकत असतात.

असाच माहोल निर्माण करून भाजपने प. बंगालातील लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या. हे यश मानावेच लागेल. 18 लोकसभा मतदारसंघांमधील हे यश म्हणजे साधारण 120 विधानसभा जागांवर भाजपास चढाई मिळाली असे मानले तरी विधानसभेची लढाई वेगळी आहे. प. बंगाल निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा मुद्दा काय? तर ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’ म्हणत नाहीत. त्यांच्या राजवटीत ‘जय श्रीराम’ म्हणायला बंदी आहे. ममता त्यांची प्रतिमा हिंदूविरोधी बनवून भाजप प. बंगालात मते मागत आहे. यावर ममतांनी सांगितले, ‘‘मी ब्राह्मण आहे. धर्माचं राजकारण करू नका. मला हिंदू धर्म शिकवू नका.’’ नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ममता रेया पाडा येथील 1000 वर्षे जुन्या महारुद्र सिद्धनाथ मंदिरात गेल्या. तेथे पूजा केली. ‘जय श्रीराम’ला ममतांचा विरोध आहे, असा प्रचार करणाऱ्यांना उत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनी जाहीरसभेत ‘चंडी पाठ’ म्हणून दाखवले.

प. बंगालची निवडणूक अशा धार्मिक आणि व्यक्तिगत पातळीवर नेऊन ठेवण्याचे श्रेय भारतीय जनता पक्षाला द्यावेच लागेल. प. बंगालसारख्या मोठय़ा राज्याची निवडणूक जय श्रीराम, चंडी पाठ, ममतांच्या पायाचे प्लॅस्टर याभोवतीच फिरत आहे. हे आपल्या लोकशाहीचे विद्रुपीकरण आहे. ममतांच्या पायास जखम झाली. आता त्याच अवस्थेत लंगडत किंवा हातात कुबडय़ा घेऊन कार्यकर्त्यांच्या आधाराने ममता बॅनर्जी प्रचार करतील व सहानुभूती मिळवतील याची भीती भाजपला वाटत असेल तर भाजप हा तकलादू मुद्दय़ांवर प. बंगालच्या मैदानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात. अश्रूंचा बांध फुटतो, ते बरे चालते. पण ममतांच्या पायास जखम झाली हा मात्र लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न! आपल्या निवडणुका आता खोटेपणा व सहानुभूती या दोन शस्त्रांनीच लढल्या जातात.

प. बंगालात दोन्ही बाजूंनीच या शस्त्रांचा खणखणाट सुरू आहे. फक्त फरक असा की, भारतीय जनता पक्षाला तेथे तोडीस तोड उत्तर मिळत आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना, हिंमत असेल तर नंदीग्राममधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान देताच ममता बॅनर्जी यांनी वाघिणीप्रमाणे भक्ष्यावर झेप घेतली व नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणुकीचा अर्ज भरला. अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार? ममतांच्या लंगडय़ा पायास भाजपवाले घाबरले ते त्यामुळेच!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरुर यांना मोठा दिलासा…..

News Desk

रिझर्व्ह बँकेच्या ‘डिजिटल रुपी’ या डिजिटल चलनाची घोषणा

News Desk

Republic Day | तिरंग्याच्या रोषणाईने मुंबईची शोभा वाढली

News Desk