HW News Marathi
महाराष्ट्र

सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी!, सेनेचा सूचक इशारा

मुंबई | सांगलीत, जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील! असा सूचक इशारा शिवसेनेनं भाजपला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात याबाबतचे वक्तव्य करण्यात आले आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

सांगलीत , जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे खडसे यांनी आता सांगितले. मग आता जे सत्तांतर घडवून आणले त्यानुसार ही सर्व आश्वासने पूर्ण करा. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील!

सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला. तेथील पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला. हा कार्यक्रम करेक्ट व्हावा यासाठी भाजपच्या 17 नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा पाहून मतदान केले. आता त्यापेक्षा करेक्ट कार्यक्रम जळगाव महानगरपालिकेतही झाला असून भाजपच्या 27 नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. अशातऱ्हेने सांगलीपाठोपाठ जळगावात भाजपचा गड पडला आहे. जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे.

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे. भारतीय जनता पक्षाचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला. एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात राजकीय वितुष्ट आहे. खडसे यांनी भाजप सोडला त्यामागची जी कारणे आहेत त्यातले प्रमुख कारण गिरीश महाजन हे एक आहेच. जळगाव भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता. महानगरपालिका निवडणुकीत इकडचे तिकडचे लोक फोडून महाजन यांनी पालिकेत भाजपची सत्ता आणली.

महाजन यांचा कारभार एकतंत्री व अहंकारी होता. त्यामुळेच भाजप नगरसेवक कंटाळले होते. महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाचा की आपल्यात संपूर्ण क्षमता आहे, पक्षाने जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करू लागले. इतरांना तुच्छ लेखण्याचा त्यांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला आहे. खडसे यांनी नेमके हेच सांगितले आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता पाच वर्षे होती. त्या सत्तेतून पैसा व पैशांतून सर्व स्तरांवरील सत्ता विकत घेण्यात आल्या. पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपने रुजवला. पण महाराष्ट्रात 105 आमदार निवडून येऊनही भाजपला राज्याची सत्ता मिळवता आली नाही.

सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. या अनुभवांतून त्यांना शहाणपण आले तर उत्तमच. सांगली-जळगावात भाजपचा कार्यक्रम एकदम करेक्ट झाला. राज्यात इतर ठिकाणीही अशा करेक्ट कार्यक्रमांचे नियोजन योग्य वेळी होईल. शेवटी सत्ता हेच हत्यार असते व सत्ता हीच संकटमोचक, कवचकुंडले ठरतात. बाकी सारे अहंकार, गर्व व्यर्थ ठरतात. वाऱ्यावरची वरात वाऱ्याच्या झुळकीबरोबरच नष्ट होते. घाऊक पक्षांतरे करून भाजपने महाराष्ट्रात पक्ष उबदार व गुबगुबीत केला, पण त्याचा पाया भक्कम नव्हता हे आता दिसून आले.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपचे नागपूर, पुण्याचे परंपरागत गड पडले. तेथे तर लोकांचे थेट मतदान होते. भाजपच्या हातातून वाळू सरकत असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. महाराष्ट्रात ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून येथील लोकांच्या मनातले भय नष्ट झाले. त्यामुळे लोक निर्भय बनून मतदान करीत आहेत. ई.डी., आयकर विभागाचे भय सामान्य माणसांना असण्याचे कारण नाही. आतापर्यंत हे भय दाखवूनच भाजपने राजकीय स्वार्थ पाहिला. पोलीस यंत्रणेचा वापर करून ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका जिंकल्या. ते भयच आता उरले नसल्याने लोक मुक्तपणे संचार करू लागले आहेत. हा शेवटी सत्तेचाच महिमा असतो. भाजपने हे महिमामंडन केले.

त्यामुळे भाजपला आता महाविकास आघाडीकडे बोट दाखवून आदळआपट करण्याची गरज नाही. सांगलीत, जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे खडसे यांनी आता सांगितले. मग आता जे सत्तांतर घडवून आणले त्यानुसार ही सर्व आश्वासने पूर्ण करा. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं, मनसेची प्रतिक्रिया 

News Desk

‘त्या’ प्रक्षोभक भाषण प्रकरणी मंगल प्रभात लोढा यांना आयोगाकडून नोटीस

News Desk

राज्यपालांची त्या पत्रावरून शरद पवारांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार

News Desk