HW News Marathi
महाराष्ट्र

माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण: राष्ट्रपती, पंतप्रधान यांची बदनामी केली तर चिंता करु नका, सामनातून केंद्राला टोला

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण आणि भाजपची भूमिका यावर सडकून टीका करण्यात आली आहे. लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याला स्वतः संरक्षणमंत्री फोन करुन धीर देत असतील तर राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, विद्यमान लष्करप्रमुख, नौदलप्रमुखांची बदनामी केली तर चिंता करु नका, असा खोचक सल्ला अग्रलेखात केंद्र सरकारला देण्यात आला आहे. तसेच मारहाणीसाठी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या माजी अधिकाऱ्याने चीन सीमेवर २० जवानांच्या हत्येस जबाबदार धरुन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?

चीनच्या सीमेवर २० जवान शहीद झाले. त्यांच्या हत्येचा बदला अद्याप घेतलेला नाही. चीनची अरेरावी कायम आहे. हे जे माजी नौदल अधिकारी आहेत त्यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात भाजपने रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. आता या माजी नौदल अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यापुढी हे महाशय जी काही मागणी करतील ती करुद्यात, पण आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी २० जवानांची हत्येस जबाबदार राष्ट्रपती, पंतप्रधान संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, पण सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरु आहे तो पाहता ऑलम्पिकमध्ये पोरखेळ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल.

लोकांच्या पोटापाण्याचा, रोजीरोटीचा, शिक्षणाचा, आरोग्याचा विषय राष्ट्रीय पातळीवरच चर्चेला आला पाहिजे, पण लोकांच्या पोटापाण्याचे, सुरक्षेचे विषय अडगळीत ढकलण्यासाठी इतर नको ते विषय उकरुन काढले जात आहेत. हा जनताद्रोहच आहे. चीनच्या प्रश्नावरुन लक्ष हटवण्यासाठी खटाटोप सुरु आहे. महागाई, बेरोजगारी या जणू समस्या नाहीत, असे वातावरण सरकारी पक्षाच्या सायबर फौजा करत आहेत. आता त्यांनी या महान राष्ट्रीय कार्यास पुढे नेण्यासाठी मुंबईची जाणीवपूर्वक निवड केली आहे. जे कुणी निवृत्त अधिकारी महोदय आहेत त्यांनी राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर फिरवून काय मिळवले? घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कुणी शिकवले नव्हते का? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, विद्यमान लष्करप्रमुख, नौदलप्रमुखांची बदनामी केली तर चिंता करु नका

सामनाच्या अग्रलेखात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर देखील गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यात म्हटलं आहे, “आश्चर्य असे की देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह महोद्यांनी तातडीने या माजी नौदल अधिकाऱ्याशी फोनवर चर्चा करुन धीर वगैरे दिला. उद्या मनात आलेच तर राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, विद्यमान लष्करप्रमुख, नौदलप्रमुखांची बदनामी केली तर चिंता करु नका. तुम्हाला या महान कार्यबद्दल पद्म पुरस्कार किंवा विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात येईल. हे असली दळभद्री प्रकार ज्या राज्यात चालवले जातात तो देश जागतिक स्तरावर काय झेप घेणार?”

“ज्या अखलाखची हत्या गोमांस प्रकरणात झाली, त्याचा मुलगाही देशाच्या लष्करातच सेवा बजावत आहे. ६४ वर्षांचे निवृत्त सैन्य अधिकारी कॅ. अमानुल्ला व त्यांच्या पत्नीवर घरात घुसून जमावाने हल्ला केला. त्यात कॅ. अमानुल्ला ठार झाले. ही घटना भाजपशासित योगी राज्यात अलीकडेच घडली. त्याबद्दल पंतप्रधान, संरक्षणमंत्री साहेबांनी निवृत्त कॅप्टनच्या पत्नीस फोन करुन चर्चा वगैरे केल्याचे कधी वाचनात आले नाही. शिवाय मागील 24 तासात कर्नाटकात तीन पुजाऱ्यांना ठेचून मारण्यात आले. उत्तर प्रदेशात मंदिरात जाणाऱ्या पुजाऱ्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. पालघर येथील दुर्दैवी घटनेचं राजकीय भांडवल करणारे आणि त्यांचे मीडियातील हस्तक या दोन्ही घटनेंबद्दल मात्र गप्प आहेत,” असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“मुंबईचा अवमान करणाऱ्या नटीला सुरक्षा, मग सामुहिक बलात्कार करुन धमकी मिळालेल्या महिलेला का नाही?”

“एका नटीने मुंबईचा, मुंबई पोलिसांचा अवमान केला म्हणून त्याची चीड व्यक्त केली तर त्याला धमकी मानून तिला वाय प्लस अशी जोरदार सुरक्षा व्यवस्था हिमाचल आणि केंद्र सरकारने दिली. पण हिमाचलातील कांगरा भागात एका विवाहित महिलेवर सात जणांनी सामुदायिक बलात्कार केला. पुन्हा तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे दहशतीखाली जगणाऱ्या त्या अबलेस झेड सुरक्षा तेथील मुख्यमंत्र्यांनी, देशाच्या गृहमंत्र्यांनी द्यायलाच हवी होती. तसे का झाले नाही?” असाही सवाल विचारण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरमध्ये रुग्णालयाला भीषण आग

News Desk

जोरजबरदस्ती करुन, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पडता येत नसेल तर मनाचा गोंधळ उडतो

News Desk

नांदेड जिल्ह्यात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ८०१ प्रकरणे निकाली

News Desk