HW News Marathi
Covid-19

सामना अग्रलेख : महाराष्ट्र पुढेच जाईल ! संकटाचे काय घेऊन बसलात !

मुंबई | आज हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ही जास्त आहे मात्र महाराष्ट्र या संकटातूनही बाहेर पडेल असा विश्वास सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केला आहे.

सामना अग्रलेख

करंटेपणा, नतद्रष्टपणा, अप्पलपोटेपणा व द्वेष-द्रोह यांना डावलून जेथे जेथे माणुसकी उसळून प्रकट होते तेथे तेथे महाराष्ट्र धर्म मूर्तिमंत प्रकट झालेला असतो. हा ‘महाराष्ट्र धर्म’ वाढता वाढतच जाईल. महाराष्ट्रीय आचार-विचारांचा मानदंड हिंदुस्थानात प्रस्थापित होईल. देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल. हिरक महोत्सवी महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करून हिमालयासही दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्राचा हिरक महोत्सव एरव्ही मोठ्या थाटामाटात साजरा झाला असता, पण हा महाराष्ट्र दिन एका वेगळ्याच सावटाखाली उगवला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आज आहे व ते उद्धव ठाकरे आहेत. त्या आनंदास आजच्या महाराष्ट्र दिनी आनंदाचे उधाण आले असते. सरकारी सोहोळे ठेवा बाजूला, पण राज्याच्या 11 कोटी जनतेनेच यावेळचा महाराष्ट्र दिन वेगळ्या तऱ्हेने साजरा केला असता. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर 28 नोव्हेंबर 2019 रोजी शपथ घेतली. तो उत्साह, शिवतीर्थावर व राज्यभरात उसळलेल्या आनंदाच्या लाटा ज्यांनी अनुभवल्या त्यांना आम्ही काय सांगतोय ते लक्षात येईल. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढत असताना महाराष्ट्र दिनाचा 60 वा सूर्य उगवला आहे.

सूर्य नेहमीप्रमाणे प्रकाशमान, तेजस्वी आहेच, पण जनता सरकारी आदेशाने कुलूप बंद आहे. शेवटी महाराष्ट्राच्या तेजस्वी लढय़ाच्या या आठवणी अमर राहणारच! मऱहाटी जनतेने शिवरायांचा जयजयकार करीत मुंबईसह महाराष्ट्र स्थापनेचा मोठा लढा दिला. 105 हुतात्म्यांची आहुती देत दिल्लीच्या तख्ताला झुकवून संयुक्त महाराष्ट्र मिळवला. त्या महाराष्ट्राचा हिरक महोत्सव त्याच तोलामोलाने साजरा झाला असता, पण ज्याने मोरारजींच्या अंदाधुंद गोळीबाराची पर्वा केली नाही तो महाराष्ट्र आज एका विषाणूशी लढत आहे. अर्थात, असे अनेक विषाणू महाराष्ट्राच्या मुळावर आले व संपले. राज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावतच आला आहे. त्या प्रगतीरथास कोरोनाच्या संकटामुळे ब्रेक लागेल काय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र हा लढवय्या आहे व तो या संकटाला परतवून लावेल. हे लढवय्येपण

महाराष्ट्राच्या दुश्मनांबरोबर

दाखवता येईल, पण ही लढाई राज्याच्या अस्मितेची, उद्योगधंदे, रोजगार वाचविण्याची आहे. दीड महिन्यापासून राज्यात टाळेबंदी आहे. उद्योग-व्यापारास टाळे आहे व आतापर्यंत तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान राज्याच्या प्रगतीस खिळ घालणारे आहे. विजयी उन्मादाच्या आरोळय़ा ठोकून, राजकीय कुरघोडय़ा करून हे संकट दूर होणार नाही. शेवटी ‘महाराष्ट्र धर्म’ नावाचा जो मंत्र आहे तो काही जादुटोणा किंवा अंधश्रद्धा नाही. हा मंत्र मराठीजनांच्या घामातून, श्रमातून निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचा अभ्युदय या मंत्रानेच झाला आहे. समृद्ध शेती, भरभराट झालेली कारखानदारी, व्यापार-उदीमाची ऊर्जितावस्था, दारिद्रय़ व बेरोजगारी यापासून मुक्तता अशा सुखी राहणीच्या दृष्टिगोचर बाबी आहेत.

सामान्यत: त्यावरूनच व्यक्तीची, समाजाची किंवा राष्ट्राची ऊर्जितावस्था मापली जाते. त्यासाठीच कर्तृत्व खर्ची पडते. पुन्हा संस्कृती हा एक प्रकार आहेच. महाराष्ट्रधर्म हीच संस्कृती आहे व ती महाराष्ट्राच्या अंत:करणात, आचारविचारात रुजलेली आहे. महाराष्ट्राचे दैनंदिन जीवन त्याच सांस्कृतिक मंगलतेने ओतप्रोत भरले असून तोच महाराष्ट्र धर्म बनला आहे. त्या महाराष्ट्रधर्माची भगवी पताका आज महाराष्ट्राच्या मंत्रालयावर डौलाने फडकत असली तरी त्यास कोरोना संकटाच्या वेदनेची किनार स्पष्ट दिसत आहे. साठ वर्षांचा महाराष्ट्र आतापर्यंत अनेक नेत्यांनी विविध विचारांनी घडवला. या काळात महाराष्ट्रावर काय कमी घाव घातले गेले? हे सर्व घातकी घाव झेलून महाराष्ट्र नवे रूप घेऊन लढत राहील. महाराष्ट्राला आता नव्याने झेप घ्यावी लागेल. नव्या संकटाने जी ग्लानी आली आहे ती दूर करण्यासाठी नव्या उमेदीने उभे राहावे लागेल. कारखानदारी व त्यात श्रमणारे कोटय़वधी हात हीच महाराष्ट्राची खरी ताकद. आज ती यंत्रे बंद आहेत व हात रिकामे आहेत. त्यात पुन्हा जान फुंकावी लागेल. महाराष्ट्राचा मर्द गडी आजही राष्ट्राच्या रक्षणासाठी

छातीचा कोट करून

उभा आहे. राज्याचा हिरक महोत्सव साजरा होत असताना देशाच्या लष्करप्रमुखपदी एक अस्सल मराठी माणूस विराजमान असावा हाच महाराष्ट्र धर्माचा लौकिक आहे. गेल्या साठ वर्षांत हजारो मराठी जवानांनी देशरक्षणासाठी बलिदान दिले. या महाराष्ट्र धर्माची तुलना कशाशीच करता येणार नाही. हिमालयाचे रक्षण करणे हा महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. तसा संकटकाळी प्रांतवाद संपवून राष्ट्रवादाची कास धरणे हा सुद्धा महाराष्ट्राचा संस्कार आहे. कोरोनाच्या या संकट काळातही देशभरातल्या अनेकांच्या जात, धर्म, पंथाचा विचार न करता पोटापाण्याची व्यवस्था करणारा, त्यांना आपुलकीने जवळ करणारा हाच महाराष्ट्र धर्म आहे. महाराष्ट्राने स्वत:चा मार्ग स्वत:च निर्माण केला आहे. आजही ज्ञान आणि विज्ञानात महाराष्ट्र दोन पावले पुढेच आहे.

कोरोनाशी दोन हात करत त्यावर मात करणारी ‘लस’ निर्माण झालीच तर ती महाराष्ट्रातच! याचा आम्हाला विश्वास आहे. पुण्यातली ‘सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ ही संस्था त्या दिशेने पुढे निघाली आहे. कोरोना संकटात महाराष्ट्राने देशासाठी जे करायचे ते सर्व केले. स्वदेशी किट निर्माण करून नवनवे प्रयोग करीत देशाला संकटमुक्त करणे हेच ध्येय्य मानणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. हिमालय संकटात असताना मराठी जवान लढत असतात तसे मऱहाटी वैज्ञानिक, डॉक्टर्स, पोलीसही हिमालयाच्या रक्षणासाठीच लढत आहेत. करंटेपणा, नतद्रष्टपणा, अप्पलपोटेपणा व द्वेष-द्रोह यांना डावलून जेथे जेथे माणुसकी उसळून प्रकट होते तेथे तेथे महाराष्ट्र धर्म मूर्तिमंत प्रकट झालेला असतो. हा ‘महाराष्ट्र धर्म’ वाढता वाढतच जाईल. महाराष्ट्रीय आचार-विचारांचा मानदंड हिंदुस्थानात प्रस्थापित होईल. देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल. हिरक महोत्सवी महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करून हिमालयासही दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या लेह भेटीसाठी खोटे रुग्णालय उभारले?

News Desk

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत

News Desk

बच्चन कुटुंबानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव…

News Desk