मुंबई | मराठा आरक्षणप्रश्नी काल (१६ जून) कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चा कडून आयोजित मुक आंदोलन पार पडल्यानंतर आज (१७ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक यांची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईतील मुख्यमंत्री निवास स्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहे.
कोल्हापूरमध्ये काल शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विविध पक्षांचे आमदार खासदार आणि वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन पार पडलं. या आंदोलनामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे सर्व कुटुंबीय देखील उपस्थित होते. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतीश पाटील आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती तयार असतील तर त्यांची तत्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घडवून आणू असं आश्वासन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या समोर बोलताना दिलं होतं.
यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राज्यभरातून आलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांची मुक आंदोलन संपल्यानंतर त्या ठिकाणीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते ग्राम विकास मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाला प्रतिसाद देत उद्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निश्चित करण्यात आलं. त्यानुसार आज, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
या बैठकीमध्ये प्रामुख्यानं पाच मागण्या करण्यात आलेले आहेत त्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात येणार आहे. यामध्ये मराठा आरक्षण प्रश्नी तात्काळ पुनर्विचार याचिका राज्य सरकारने दाखल करावी. सारथी संस्थेला आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी. मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर पडल्यानंतर त्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात यावी. कोपर्डी प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.
यासह मराठा आंदोलनादरम्यानच्या ज्या तरुणांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घेण्यात यावं यासह अनेक इतरही मागण्या आहेत. याबाबतचे निवेदन खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी यापूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले होते. परंतु तरी देखील अद्याप मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत मागण्या मान्य होतात की पुन्हा मराठा समाजातील नेत्यांना सरकार आश्वासन देणार हे पाहणं महत्त्वपूर्ण होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
…पण मी एकटा मुंबईला जाणार नाही, संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका
‘आपण अनेक पर्याय त्यांना दिले होते. पण, त्याबद्दल फारसं कुणी बोललं नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे’ असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
‘पण मी चर्चेसाठी एकटा जाणार नाही. अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला 4 जून रोजी फोन केला होता. की आपण मुंबईमध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितलं. आम्ही आमच्या आमच्या मागण्या मांडल्या आहे. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटलं ही सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. त्यामुळे मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते’ असा खुलासाही संभाजीराजेंनी केला.
‘ नऊ दिवस झाले काही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचं स्वागत करतो. मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील, लावून धरत असतील तर ते चांगलंच आहे. आम्ही सुद्धा माणसं आहोत, विषय ताणून धरणाच्या आमचा विचार नाही. पण, मी एकटा भेटायला जाणार नाही. मराठा समन्यवकांनी ठरवावं, कोण-कोण चर्चेला येणार आहे, तुम्ही ठरवावं, आपण मार्ग काढूया’ असंही संभाजीराजे म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.