HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया – संदीप देशपांडे

ठाणे | “अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया”, असे आवाहन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिले आहे. मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेने आता आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.

“अविनाश जाधव यांना काल (३१ जुलै) तडीपारीची नोटीस तर दिलीच, पण त्यांच्यावर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याने, अविनाश जाधव यांनी आंदोलन केले, हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे”, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

“सरकार आणि पालकमंत्र्यांना असे गुन्हे दाखल करुन आम्हाला गप्प बसवता येईल असे वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. जेव्हा सरकार आले तेव्हा हे शिवशाहीचे सरकार असे म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचे नाही तर मोघलाईचे आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार” असेही देशपांडे म्हणाले.

“आम्ही सर्वजण अविनाश जाधवच्या समर्थनार्थ ठाण्याला जातोय. आम्ही सर्वजण अविनाशच्या पाठिशी आहोत, आम्हाला कोण अडवतंय ते बघायचं आहे”, असं आव्हान संदीप देशपांडे यांनी दिलं.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी अविनाश जाधव हे आंदोलन करत होते.  वसई पालिका आयुक्त दालनात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांतून तडीपार होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

Related posts

साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला

अपर्णा गोतपागर

दिग्विजय यांचे मोदींना आव्हान, हिंमत असेल तर माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

News Desk

चिंताजनक ! दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

News Desk