मुंबई। आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज आणखी काही खळबळजनक खुलासे केले आहेत. ‘शाहरुख खान यानं बोगस कारवाईच्या विरोधात आवाज उठवू नये यासाठी त्याला आजही धमकावलं जात आहे,’ असा आरोप मलिक यांनी केला आहे.मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आर्यन खानच्या अटकेनंतर त्याच्या सोबत व्हायरल झालेल्या किरण गोसावी याच्या सेल्फीमुळं हे प्रकरण संशयास्पद असल्याचं समोर आलं होतं. नवाब मलिक यांनी हे फोटो जाहीर करून किरण गोसावी याची पार्श्वभूमी सांगितल्यानंतर हळूहळू एकेक साक्षीदार पुढं आला. आर्यन खानला अडकवण्यासाठी ही कारवाई झाल्याचं व शाहरुख खानकडून ५० लाख रुपये घेतल्याचंही एका साक्षीदारानं सांगितलं आहे. त्यामुळं आता समीर वानखेडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पूजा ददलानी यांनी घाबरू नये
ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत अडकवल्या गेलेल्या लोकांनी पुढं येऊ नये, अधिकाऱ्यांविरोधात काही बोलू नये म्हणून त्यांना घाबरवलं जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. ‘शाहरुख खानच्या बाबतीतही हेच सुरू आहे. शाहरुख खान व त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांना घाबरवलं जात आहे. ‘तुम्ही ५० लाख रुपये दिले आहेत. तुम्हाला या प्रकरणात आरोपी केलं जाईल. नवाब मलिक यांनी बोलणं थांबवलं नाही तर तुझा मुलगा आणखी अडकेल, असं सांगितलं जात आहे. मात्र, शाहरुख व पूजा ददलानी यांनी घाबरू नये. पीडित कधीही आरोपी होत नाही. एखाद्याला घाबरवून त्याच्याकडून पैसे घेतले तर तो आरोपी होऊ शकत नाही. मुलाच्या अटकेची भीती दाखवून शाहरुखकडून पैसे वसुल करण्यात आलेले आहेत, त्यामुळं शाहरुख पीडित आहे,’ असं मलिक म्हणाले. ‘एनसीबीनं आतापर्यंत ज्यांच्या-ज्यांच्याकडून पैसे उकळले आहेत, त्या सर्व पीडित लोकांनी आता पुढं यावं. अजिबात घाबरू नये. मी लढत असलेल्या लढाईला साथ द्यावी,’ असं आवाहनही त्यांनी केलं.
‘नवाब मलिक आता घाबरणार नाही. तसा कुणी प्रयत्नही करू नये. सत्य समोर येईल. सत्याचा विजय होईपर्यंत मी थांबणार नाही. माझ्या जावयशी देखील माझी चर्चा झालीय. आठ महिनेच काय २० वर्षे तुरुंगात राहण्याची तयारी त्यानं दाखवलीय, पण ही लढाई सुरू ठेवा असं त्यानं सांगितलंय,’ असंही मलिक म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.