HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला, शालिनीताई पाटलांचा आरोप

पुणे | साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने काल (१ जूलै) कारवाई केली आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून कारखाना बळकावल्याचा आरोप एबीपी माझाशी बोलताना केला आहे. यावेळी गंभीर आरोप शालिनीताई यांनी केले आहेत.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा लिलाव झाला तेव्हा घाडगे यांनी खरेदी केला होता. लिलाव प्रक्रियेला माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. ”देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच,” असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.“आमच्या कारखान्याचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला होता. केवळ तीन कोटींचा हफ्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या कारखान्याचं त्यांच्याकडे जे अकाऊंट आहे त्या खात्यात आठ कोटी ३४ लाख जमा होते. ते पैसे वळवण्यास सांगितलं असता दुर्लक्ष करण्यात आलं”.

“सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आलं असतं. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. विचारणारं कोणी नव्हतं. त्यांनी सत्तेचा पुरेपूर गैरफायदा केला आणि २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार अजित पवारांच्या काळात झाला,” असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

थोडा उशीर झाला पण आता ईडीने कारवाई केली असून आम्हाला न्याय मिळाला

“थोडा उशीर झाला पण आता ईडीने कारवाई केली असून आम्हाला न्याय मिळाला आहे. वास्तविक २०१९ मध्ये अण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि मी अशा चार जणांनी अर्ज केला होता. अरोरा यांनी नंतर माघार घेतली. २०१९ मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी ईडीने एफआयआर दाखल करुन घेतला होता. पण काहीच कारवाई न झाल्याने दुसरा अर्ज करण्यात आला. त्याला ईडीने आम्हाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचार झाला असल्याचं त्यांनी मान्य केलं. २७ हजार सभासदांना न्याय मिळाला आहे,” अशी भावना शालिनीताई यांनी व्यक्त केली आहे.

राजू शेट्टी यांच्या मागणीवर शालिनीताई काय म्हणाल्या?

एकाच नाहीतर राज्यातील 43 कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यावर शालिनीताई म्हणाल्या की, “राजू शेट्टी यांचं म्हणणं बरोबर आहे. सर्वात पहिला नंबर आमच्या कारखान्याचा होता. आता इतर देखील सुरुवात होईल. 43 पैकी 38 कारखाने राष्ट्रवादीकडे आहेत. कुठून आला पैसा. याविरोधात देखील आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. वकील तळेकर या प्रकरणी कोर्टात लढाई लढत आहेत. लवकरच यांच्यावर देखील कारवाई होईल.”

जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना आणि मशिनरी जप्त करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात कागदी व प्लास्टिक ध्वजांचा वापर टाळावा! – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी

Aprna

मुंबईच्या हद्दीत ८ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Aprna

अहिल्यादेवी जयंतीला पक्षीय रूप देण्याचा ‘राष्ट्रवादी’ चा प्रयत्न! – राम शिंदे

Aprna