HW News Marathi
Covid-19

‘देशातलं आरोग्यखातं अपयशी,गडकरींकडे सुत्र सोपवा’ शिवसेनेचा गडकरींना पाठिंबा !

मुंबई | देशामध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनत चालली आहे. भारताची आरोग्यव्यवस्था पुरती कोलमोडून गेली आहे.या सगळ्या परिस्थितीमध्ये आरोग्यव्यवस्था अपयशी ठरली आहे त्यामुळे नितीन गडकरींना या आरोग्यव्यवस्थेचा कार्यभार सोपवण्याबाबत विचार व्हावा असे मतं सामनातून व्यक्त करण्यात आले आहे.पंतप्रधान मोदी यांनी देश सावरण्यासाठी कठोर परिश्रम आणि राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल,जागतिक मंचावर भारताची अवस्था बिकट होणे बरे नाही! अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज कोरोना परिस्थितीवरुन केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढण्यात आले आहेत

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?

भारतापासून जगाला धोका असल्याची चिंता आता ‘युनिसेफ’नेही व्यक्त केली आहे. कोरोना ज्या वेगाने भारतात पसरत आहे त्यापासून संपूर्ण जग संकटात येईल. त्यामुळे भारताला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांनी जास्तीत जास्त मदत करावी, असे युनिसेफतर्फे सांगण्यात आले आहे. बांगलादेशने भारताला 10 हजार रेमडेसिवीर वायल्स देणगी दाखल पाठवले. भूतानसारख्या देशाने ऑक्सिजन पाठवला. नेपाळ, म्यानमार, श्रीलंकासारखे देशही आत्मनिर्भर भारताला मदतीचा हात पुढे करीत आहेत. स्पष्ट सांगायचे तर आजही भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर. नाहीतर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते.

भारतातील पेटलेल्या चितांचा धूर आजूबाजूच्या देशांना गुदमरून टाकत आहे. या धुरातून कोरोना आपल्या देशात पसरू नये यासाठी अनेक गरीब देशही भारताला दयाबुद्धीने मदत करू लागले आहेत. कधीकाळी ही वेळ पाकिस्तान, रवांडा, कोंगोसारख्या देशांवर येत असे. आज राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱया भारतावर आली. गोरगरीब देश आपल्याला त्यांच्या ऐपतीने किडुकमिडुक मदत करीत असले तरी आपले सन्माननीय पंतप्रधान महोदय 20 हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. दिल्लीत नवे संसद भवन, त्यात पंतप्रधानांचा नवाकोरा महाल या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे व त्याच देशाने बांगलादेश, भूतान, श्रीलंकासारख्या देशांकडून कोरोना निवारणासाठी मदत स्वीकारायची, याची खंत कोणाला वाटू नये याचे आश्चर्य वाटते, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“गुरुवारच्या दिवशी राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष, शेतकरी नेते अजितसिंह कोरोनाचे बळी ठरले. पत्रकार शेष नारायण सिंह करोनामुळे सोडून गेले. या दोघांनाही पंतप्रधान मोदी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. देशाची अवस्था भयावह बनली आहे. त्या भयाचा धसका आपल्या दिल्लीश्वरांनी किती घेतला ते सांगता येत नाही, पण जगाने मात्र भारतातील या परिस्थितीचा मोठाच धसका घेतला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरू असताना तिसऱ्या लाटेची धडक यापेक्षा जोरात बसेल, असे तज्ञ सांगतात, पण भाजपाचे लोक आजही प. बंगालात ममता बॅनर्जी यांची राजकीय कोंडी करण्याचा नाद सोडायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालय करोनाप्रकरणी रोज केंद्र सरकारला चाबकाने फोडून काढत आहे. एखादे संवेदनशील किंवा राष्ट्रभक्त सरकार असते तर राजकीय फायद्या-तोट्याचा विचार न करता सर्वच पक्षांच्या प्रमुखांचे एक राष्ट्रीय पथक बनवून या संकटाशी कसे लढावे यावर सल्लामसलत केली असती, पण प. बंगालात एका राज्यमंत्र्यांच्या गाडीवर दगड पडल्याच्या बहाण्यातच केंद्र सरकार गुंग झाले आहे. करोनाचे संकट इतके गहिरे आहे व सर्वोच्च न्यायालयाचे चाबूक इतके जोरात पडत आहेत की, त्यामुळे सरकारचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. त्यामुळे सरकारने करोनाप्रकरणी एक अक्षरही बोलू नये अशी परिस्थिती आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“उत्तर प्रदेशात श्रीराम मंदिर बांधण्याचा भूमिपूजन उत्सव करोना काळातच केला. त्याच उत्तर प्रदेशात भाजपाचे आमदार करोनाने मृत्युमुखी पडताना दिसत आहेत. सर्वत्र भीती व गोंधळाचे वातावरण आहे. सरकारचे डोके चालायचे एकतर बंद झाले आहे किंवा सरकारने संकटसमयी शस्त्र टाकून दिली आहेत. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोग्य मंत्रालयाची सूत्रे नितीन गडकरी यांच्यासारख्या धावपळ करणाऱ्या कार्यक्षम मंत्र्याकडे देण्याचे सुचवले. त्या मागची तळमळ समजून घ्या. देशाचे आरोग्यखाते सपशेल अपयशी ठरल्याचाच हा पुरावा आहे. भारतात गेल्या १० दिवसांत सर्वाधिक करोना बळी गेल्याची जागतिक नोंद आहे. जगातील पाचपैकी एक सक्रिय करोना रुग्ण भारतात आहे, एवढी सध्या आपल्या देशातील करोना स्थिती भयंकर आहे. देशात प्रति तासाला १५० करोना बळी जात आहेत. मागील १० दिवसांत भारतात ३६ हजार ११० करोना बळी गेले. हे आकडे धडकी भरवणारे आहेत. अमेरिका, ब्राझिलला आपण मागे टाकले. हे चित्र बरे नाही. जगाला आता भारताची भीती वाटू लागली आहे. भारतात जाण्यापासून व्यापार-उद्योग करण्यापासून त्या देशांनी आपल्या लोकांना रोखले आहे. भारतात विमान आणि प्रवासबंदी केली. याचा आर्थिक फटका भारताला बसत आहे. तरीही देश तग धरून राहिलाय तो ७० वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच. ती पुण्याई मोठी आहे. पंतप्रधान मोदी यांना देश सावरण्यासाठी कठोर परिश्रम व राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल. जागतिक मंचावर भारताची अवस्था बिकट होणे बरे नाही!,” असा इशारा शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरविंद केजरीवाल यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

News Desk

आरोग्य विभागाच्या परीक्षार्थ्यांना राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे ‘हे’ आवाहन

News Desk

कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी, मुंबई हायकोर्टाने केंद्राला फटकारलं

News Desk