HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शहांनी कितीही ताकद पुरवली तरी शिवसेना नारायण राणेंना धुळ चारल्याशिवाय शांत राहणार नाही…! 

मुंबई | शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली. केंद्रीय ग्रुहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाट्टेल तितकी ताकद पुरवावी. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नारायण राणेंना पुन्हा एकदा धुळ चारत त्यांच्या छाताडावर बसून भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही. याअगोदर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी महसुल मंत्री, उद्योग मंत्री अशी मोठमोठी पदे देऊन नारायण राणेंना ताकद पुरवण्याचा खटाटोप केला होता. त्यावेळी नारायण राणेंचा माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. त्या पराभवाची नारायण राणेंनी इतकी धास्ती घेतली की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक न लढवता त्यांनी अक्षरशः रणांगणातून पळ काढला.

त्यामुळे राणेंना ताकद पुरवताना ते पुन्हा एकदा शिवसेनेला घाबरून निवडणुकीच्या रणांगणातून पळ काढणार नाहीत याची खातरजमा शहांनी करून घ्यावी. जर नारायण राणेंनी सर्व धैर्य एकवटून पुढची विधानसभा निवडणूक लढवली तर त्यांना चारी मुंड्या चीत करून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची जबाबदारी बाळासाहेब आणि उद्धवजींचा शिवसैनिक म्हणुन सर्वस्वी माझी राहिल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे दबंग नेते’ असा केला. मग या दबंग नेत्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश देताना ‘तारीख पे तारीख’ देऊन वर्षभर ताटकळत का ठेवले होते…?

या प्रश्नाचे उत्तर सुद्धा फडणवीसांनी द्यायला हवे होते. या कार्यक्रमात अमित शहा नारायण राणेंच्या वेगवेगळ्या प्रतिमांविषयी बोलत होते. नारायण राणेंची नेमकी प्रतिमा काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षापुर्वी विधानपरिषदेच्या सभाग्रुहात नारायण राणेंवर केलेल्या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी आवर्जुन पाहावा. त्या व्हिडिओमध्ये फडणवीसांनी नारायण राणेंनी केलेल्या गुन्ह्यांची कुंडली मांडून भर विधानपरिषदेत त्यांच्या अब्रुची लख्तरे अक्षरशः वेशीवर टांगली होती. जेणेकरून नारायण राणेंनी भुतकाळात काय काय दिवे लावलेत आणि त्यांची प्रतिमा किती उजळलेली आहे हे शहांच्या लक्षात येईल.

अमित शहांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले दिले आणि शिवसेना संपवण्याची भाषा सुद्धा केली. ते कदाचित विसरले असतील की सोळाव्या शतकात आपल्या अफाट ताकदीच्या जोरावर अफजलखान शिवाजी महाराजांचे स्वराज्य संपवून टाकण्याचा विडा उचलून दिल्लीतून इकडे महाराष्ट्रात आला होता. महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचे थडगे बांधले. शिवसेना संपवण्याची भाषा करण्याअगोदर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास त्यांनी एकदा तपासून पाहावा. अमित शहा असेही म्हणाले की शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार तापी नदीत बुडवले.

मग जम्मु काश्मीरमध्ये पीडीपीच्या महबुबा मुफ्तीसोबत भाजपने युती करून सत्ता स्थापन केली होती, तेव्हा आरएसएसच्या हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, नानाजी देशमुख या नेत्यांचे विचार शहांनी कोणत्या नाल्यात बुडवले होते…? आता सुद्धा बिहारमध्ये नितीश कुमारांसोबत भाजप सत्तेत आहे. मग बिहारमध्ये तथाकथित हिंदुत्ववादी भाजप सेक्युलर बनलीय की सेक्युलर जेडीयु हिंदुत्ववादी बनलीय याचेही उत्तर त्यांनी एकदा द्यायला हवे. शहांच्या मते महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश दिलेला असताना महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. मग गोव्यात आणि मध्य प्रदेशात भाजपला जनादेश मिळाला होता का…?असा सवालही वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे,

जनादेश हा शब्दसुद्धा भाजपच्या मंडळींनी उच्चारू नये. त्याच्याशी तुमचा काडीमात्र संबंध नाही. निवडणुकांमध्ये जनतेने नाकारले असेल तर ‘ऑपरेशन लोटस’च्या गोंडस नावाखाली अमर्याद पैशांचा वापर करून आमदारांची फोडाफोडी करायची आणि येनतेन प्रकारेण सत्ता हस्तगत करायची, ही भाजपची कार्यपद्धती आहे. देशाच्या राजकारणात घोडेबाजार हा शब्द उदयास येण्यासाठी सर्वस्वी भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे. महाराष्ट्रात देखील पहाटे पहाटे सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे नापाक मनसुबे अयशस्वी झाल्यामुळेच कोल्ह्याना आता द्राक्षे आंबट लागत असुन एकाएकी लोकशाहीतील जनादेशाची आठवण झाली आहे. ‘हम करे तो रासलीला और बाकी करे तो केरेक्टर ढिला’ त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल.असा टोला ही वैभव नाईक यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळांमुळे माझा विजय

News Desk

#CoronaVirus | आता शहरांतील झोपडपट्टी परिसरांतही ‘कोरोना’चा शिरकाव

News Desk

वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पातून ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ची पुन्हा प्रचिती

Aprna