HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, औरंगाबाद मुद्द्यावरुन सेना आक्रमक

मुंबई | औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जुन्या आणि वादाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात असतानाच भाजपने मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडून उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीमुळे शहराच्या नामांतराच्या मुद्द्यांनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. काँग्रेसनं नामांतराला विरोध दर्शवताच विरोधी बाकांवरील भाजपानं त्यावरून शिवसेनेला भूमिका स्पष्ट करण्याबद्दल सवाल केला. भाजपाकडून लक्ष्य केलं जात असल्याचं दिसताच शिवसेनेनंही भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱयांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे!

औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळय़ा फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करून टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत. निदान या विषयावरून सरकारात ठिणगी तरी पडेल, असे काही लोकांना वाटत आहे. राज्याचे महसूल मंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे संभाजीनगरात गेले व त्यांनी जाहीर केले, औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला काँग्रेसचा विरोधच असेल! हा थोरातांचा दावा आहे.

यावर भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचा घोर लागला व आता शिवसेना काय करणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटील वगैरे लोकांनी विचारला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आग्रही राहिली आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने नामांतरास विरोध केल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा भाजपचा आग्रह आहे. यात भूमिका स्पष्ट करावी असे काय आहे? शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल.

भाजपास त्याची काळजी नको. औरंगाबादचे संभाजीनगर हा लोकनिर्णय आहे.टेकत असतील तर तो त्यांचा प्रश्न. आता प्रश्न राहिला भाजपच्या थयथयाटाचा. अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. त्यांच्या या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भारतीय जनता पक्षाचा जो ज्ञानरथ अलीकडच्या काळात उधळला आहे त्या रथाचे पुढचे चाक म्हणजे चंद्रकांत पाटील असाच समज यामुळे मराठी जनतेचा होईल, पण पाटलांच्या या बिनतोड सवालास पूरक म्हणून आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत? ते जरा जनतेला सांगून टाका!

महाराष्ट्रात फडणविसांचे व दिल्लीत मोदींचे सरकार होते व इतर नामांतरांबरोबर छत्रपती संभाजी राजांनाही औरंगजेबाच्या छाताडावर बसवता आले असते. मग सहज शक्य असताना तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? व आता मात्र शिवसेनेस उलटा प्रश्न विचारीत आहात. अयोध्येत राममंदिर हे सर्वसंमतीने होत आहे. संभाजीनगरच्या बाबतीतही तेच होईल. बाबर हा येथील मुसलमानांचा मायबाप लागत नाही, तसा पापी औरंग्याही येथील मुसलमानांचा काका-मामा लागत नाही. अयोध्येत बाबरास गाडले व तेथे राममंदिर उभे राहात आहे म्हणून ना इस्लाम खतऱ्यात आला ना कुणाचा सेक्युलॅरिझम गटांगळय़ा खाऊ लागला. तसेच संभाजीनगरचे आहे. औरंग्याचे कब्रस्तान कुणाला निधर्मीपणाचे किंवा अस्मितेचे प्रतीक वाटत असेल तर ते या देशाच्या अस्मितेचा खेळखंडोबा करीत आहेत. साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा औरंगाबादच्या मातीत मोगल राजा औरंगजेबाला गाडला तेव्हा औरंगजेब मेला म्हणून साऱ्या हिंदुस्थानात जल्लोष झाला होता.

छत्रपती संभाजीराजांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुसलमान धर्म स्वीकारावा म्हणून मऱ्हाठय़ांच्या या राजावर औरंगजेबाने अनन्वित अत्याचार केले. पण संभाजीराजांनी हौतात्म्य पत्करून हिंदुत्व राखले. त्या औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असावे हा शिवरायांचाच अपमान ठरतो. या देशातील मुसलमान बाबराला व महाराष्ट्रातील मुसलमान औरंगजेबाला विसरले आहेत. औरंगजेब आणि औरंगाबाद हा आता मतांचा विषय राहिलेला नाही. महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादाचा मार्ग स्वीकारून शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यांना आता फालतू वाद नकोत तर विकास आणि कल्याण हवे आहे. एम.आय.एम.चा ओवेसी संभाजीनगरला येऊन औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतो. त्या ओवेसी पक्षाचा माणूस संभाजीनगरचा खासदार म्हणून निवडून यावा यासाठी उघड प्रयत्न करणारे आज शिवसेनेस औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न विचारीत आहेत. हे ढोंग तर आहेच, पण गलिच्छ विचारांची शेणफेकदेखील आहे. बाळासाहेब थोरात म्हणतात ते बरोबरच आहे.

महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने सॅनिटायझर टनेलची केली निर्मिती !

News Desk

शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे!

News Desk

विधानसभेत अमोल कोल्हे राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांच्या बरोबरीने काम करणार ?

News Desk