HW News Marathi
महाराष्ट्र

तांत्रिक बिघाडामुळे बाधित सर्व भागांचा वीजपुरवठा झाला सुरळीत

कल्याण | कळवा पडघा जिआयएस (GIS) केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सकाळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळॆ कल्याण परिमंडळातील २ लाख ६५ हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. पालघर विभागात तातडीने परिस्थिती हाताळून अवघ्या २२ मिनिटात सर्वच २ लाख ५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तर कल्याण पूर्व व पश्चिम भागात सर्व पर्यायांचा वापर करत सायंकाळी साडेपाचपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व ग्राहकांचा व वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तत्परतेने काम केले.

कल्याण शहराला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-१ व केबी-२ हे दोन फिडर सकाळी १० वाजून ५ मिनिटापासून बंद झाले होते. केबी-२ फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील जवळपास ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. तर केबी-१ फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील ९० फूट रोड, टाटा नेतीवली परिसरातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला.

या फिडरवरील शक्य त्या वीज ग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले. सकाळी सव्वाअकरापर्यंत १६ हजार तर दुपारी सव्वाबारापर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला होता. पर्यायी मार्ग तसेच टाटा पॉवरकडून उपलब्ध विजेनुसार सायंकाळी पाचपर्यंत जवळपास ५० हजार तर साडेपाचपर्यंत सर्वच ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले.

याशिवाय पालघर विभागात २० उपकेंद्र बाधित होऊन जवळपास २ लाख ५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी दहा वाजता बाधित झाला. तत्परतेने आवश्यक कार्यवाही करून अवघ्या २२ मिनिटात म्हणजेच दहा वाजून बावीस मिनिटांनी सर्वच २ लाख ५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे व पालघर मंडलच्या अधीक्षक अभियंता किरण नगांवकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांना गती दिली. कल्याण व पालघरमधील अल्प कालावधी वगळता कल्याण परिमंडलात इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण | आता मूक नव्हे ‘बोलका’ मोर्चा काढणार, मेटेंचा इशारा

News Desk

ST कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघणार? अंतरिम वेतनवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार?

News Desk

मेट्रोमुळे होणारी वृक्षहानी कमी करण्यासाठी गट स्थापन

News Desk