HW News Marathi
महाराष्ट्र

विधान परिषदेच्या ‘या’ दहा सदस्यांना निरोप

मुंबई । महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा सदस्य लवकरच निवृत्त होत असून या सर्व सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

विधानपरिषदेतून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सदस्य सर्वश्री दिवाकर रावते, सदाशिव खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, संजय दौंड, रवींद्र फाटक हे दहा सदस्य निवृत होणार आहेत. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व दहा सदस्यांच्या कारकीर्दीविषयी व त्यांच्या सभागृहातील कामगिरीविषयी आपले विचार व्यक्त केले.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं अभ्यासू, सुसंस्कृत, उच्चशिक्षित व्यक्तिमत्वं म्हणून ओळखले जाते. फलटण राजघराण्याचे २९ वे वंशज म्हणूनही त्यांचं जनमानसात वेगळे स्थान आहे. प्राध्यापक, फलटणचे नगराध्यक्ष, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे आमदार, राज्याचे मंत्री, विधान परिषदचे सभापती अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यातून विधिमंडळ सभागृहाची उंची वाढवण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी उपस्थित सदस्यांच्या मनात कायम राहतील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात निश्चितच चांगलं काम केले आहे. ते सहकारी बँकिंग क्षेत्रातून पुढं आलेलं नेतृत्व असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रासारख्या औद्योगिक, व्यापारी, आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्याचे उद्योगमंत्री म्हणून काम करताना, या राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढावी, उद्योगधंद्यांचा विकास व्हावा, उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सदस्य दिवाकर रावते यांनी मराठी भाषेसाठी आणि मराठी बांधवांच्या हक्काच्या लढ्याचा वसा आणि वारसा पुढे नेला आहे. या सभागृहातली त्यांची भाषणे, विचार पुढे नेणारी होती, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सदाभाऊ खोत हे शेतकरी संघटनेच्या चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. शेतकरी संघटनेचे नेते, दिवंगत शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदाभाऊंनी चळवळीच्या कामाला सुरुवात केली. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या मरळनाथपूर सारख्या छोट्याशा गावातला, सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्‍मलेला युवक या सभागृहाचा सदस्य होतो, राज्याच्या मंत्रीमंडळात काम करतो, ही मोठी गोष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सुजितसिंह ठाकूर हे विधिमंडळात मराठवाड्याचं प्रतिनिधीत्वं करतात. त्यांनी राजकीय, सामाजिक जीवनाची सुरुवात, परांड्यांतून केली. राजकारण, समाजकारण, सहकाराच्या बरोबरीनं शिक्षण क्षेत्रात योगदान दिलं. त्यांच्या तिथल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग त्यांना सभागृहात निश्चितपणे झाला.

विनायक मेटे यांचे संघटन कौशल्य चांगलं आहे. त्यांच्याकडे वक्तृत्वं, वकूब आहे. त्यांच्या या गुणांचा फायदा समाजाला झाला पाहिजे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सदस्य प्रसाद लाड हे राजकारण, समाजकारण, उद्योग, सेवा अशा अनेक क्षेत्रात एकाच वेळी काम करणारं नेतृत्व आहे. राज्यातल्या एका उद्योगशील प्रतिनिधीला या सभागृहाच्या माध्यमातून आपण निरोप देत असल्याची भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात जन्मलेल्या आमदार संजय दौंड यांना त्यांचे वडील माजी मंत्री पंडीतराव दौंड यांचा राजकीय, सामाजिक वारसा लाभला आहे. तो वारसा ते समर्थपणे पुढे चालवत आहेत. बीड जिल्हा परिषद सदस्य म्हणून संजय दौंड यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रदीर्घ काळ काम केल्यामुळं त्यांना जनतेच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. त्याचा उपयोग त्यांना या सभागृहात झाला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

रविंद्र फाटक हे संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात. त्यांनाही शुभेच्छा देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री अनिल परब, सदस्य सुरेश धस, दिवाकर रावते, विनायक मेटे, भाई गिरकर, सदाशिव खोत, निलय नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Related posts

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, दरेकरांचा गृहमंत्र्यांना सल्ला

News Desk

मुंबईतून हुसकवलेले फेरीवाले कल्याण डोंबिवलीत

News Desk

पंकजा मुंडेंचे अश्रू समजून घ्या विजय वडेट्टीवारांचं विधान!

News Desk