HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे गंभीर परिणाम समोर आले होते. सोलापूरात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी आता एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा अमित सुरवसे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमित सुरवसे याला सोलापुरातील दहिटणे परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात आमदार पडळकर यांच्या गाडीवर 30 जून रोजी हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर अमित सुरवसे फरार झाला होता. अखेर आज दोन दिवसांनंतर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेनं त्याला ताब्यात घेतलं आहे.

काय घडलं होतं?

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञाताने दगड भिरकावला होता. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. या घटनेचा व्हिडिओ ही समोर आला होता. या व्हिडिओमध्ये एक तरुण पडळकरांच्या गाडीवर मोठा दगड फेकताना दिसून आला. गाडीची काच फोडल्यानंतर या व्यक्तीनं त्याठिकाणाहून पळ काढला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती.

‘आज दगडफेक, उद्या गोळा मारतील’ – गोपीचंद पडळकर

महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे. ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही.

आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही. घोंगडी बैठक उरकुन बाहेर आहे. त्या बैठकीला चारशे-पाचशे लोक होते. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा 4 ते 5 लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं.

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते.

मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

 देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला,शरद पवारांची मिष्किल टिप्पणी 

News Desk

उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ पालघर पोटनिवडणुकीत आमने-सामने

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार

News Desk