HW News Marathi
महाराष्ट्र

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयामुळे गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात वाढ होणार! – अजित पवार

नाशिक । महाराष्ट्र पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण क्षमतेत गुणात्मक वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक नवीन प्रशासकीय इमारत, वसतीगृह, भोजनालय संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार हिरामण खोसकर, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालिका अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य अशोक नखाते आणि आदी मान्यवर उपस्थित होते

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, या नवीन इमारतीच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या दर्जात, गुणवत्तेत, क्षमतेत वाढ होईल, पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण संदर्भातल्या ज्ञान, अनुभव, कौशल्यात भर पडेल, राज्यातील गुन्हे नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास याचा फायदा होईल, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

साडेसात कोटी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत, 11 कोटी रुपये खर्चून वसतीगृह इमारत आणि अडीच कोटी रुपये खर्चाचं भोजनालय, सुमारे 21 कोटी रुपये खर्चून हे गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचं नवीन संकूल, नाशिकमध्ये उभं राहिलं आहे. एका वेळी 200 पोलिसांना प्रशिक्षण देऊ शकणाऱ्या या वास्तूचं लोकार्पण ही महाराष्ट्र पोलिसांसाठी आनंदाची, अभिमानाची, गौरवाची बाब आहे. प्रशिक्षण विद्यालयाच्या या नवीन इमारतीच्या उभारणीत सहकार्य, योगदान दिलेल्या सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित सर्वांचं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.

संस्थेची कामगिरी कौतुकास्पद

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, 1981 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून पोलिस अंमलदारांना गुन्ह्यांच्या तपासाचं शास्त्रोक्त, अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येतं. एफआयआर नोंदवण्यापासून चार्जशीट दाखल करण्यापर्यंतची प्रक्रिया याठिकाणी शिकवली जाते. आतापर्यंत 385 प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून 25 हजार पोलिस अंमलदारांना गुन्हे तपासाचं पायाभूत प्रशिक्षण देण्यात आलं. तर, 293 प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून 25 हजार पोलीस अंमलदारांना, 12 प्रकारच्या गुन्हे तपासासाठी विशेष प्रशिक्षित करण्यात आलं. कोविड काळात 93 सत्रांच्या माध्यमातून साडे सहा हजार अंमलदारांना इथून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलं. 2009 मध्ये विद्यालयाला गुणवत्तेचं आयएसओ मानांकनही मिळालं आहे. संस्थेची ही कामगिरी निश्चितंचं कौतुकास्पद आहे, असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाची नवीन इमारतीची रचना :

प्रशासकीय इमारत तीन मजली असून या इमारती मध्ये आठ प्रशिक्षण वर्ग, सि.सि.टी.एन.एस. प्रयोगशाळा, न्यायवैद्यक, अंगुलीमुद्रा प्रयोगशाळा, स्टुडीओ, वाचनालय,सभागृह, प्राचार्य, उप प्राचार्य, पोलीस निरीक्षक, मंत्रालयीन कर्मचारी यांचे कक्ष, स्वच्छतागृह व इंटरनेटसह अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. वसतीगृह इमारत आठ मजली असून या इमारती मध्ये प्रशिक्षणार्थी यांचे निवासाचे सुविधेकरीता 114 रुम ( प्रत्येक रुम मध्ये 2 प्रशिक्षणार्थी ) आहेत. प्रत्येक रुम मध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह, गिझर, कॉट, टेबल, खुर्ची इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. भोजनालय इमारती मध्ये एका वेळी 200 प्रशिक्षणाथींच्या भोजनाची व्यवस्था असून भोजन तयार करण्यासाठी सौर उर्जेद्वारे गरम पाण्याच्या सुविधेसह नविन तंत्रज्ञानाची साधनसामुग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

.यावेळी मंत्री महोदयांनी वसतीगृह व भोजनालयाची पाहणी केली. तसेच यावेळी या प्रकल्पाशी संबंधितांचा सत्कार यावेळी करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आला. यामध्ये पोलीस उपायुक्त (गुन्हे) पुणे शहर श्रीनिवास घाडगे, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व विकास महामंडळ मुंबईच्या अधीक्षक अभियंता अनिता परदेशी, वास्तुविशारद सुप्रिया पाध्ये, अभिजित बनकर यांचा सत्कार करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतक-यांच्या संपाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा: खा. अशोक चव्हाण

News Desk

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

Aprna

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा नसेल, तर भाजपातले…”, शिवसेनेचा खोचक शब्दांत निशाणा!

News Desk