HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्या; दत्तात्रय भरणेंच्या सूचना

सोलापूर | जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक विभागांनी कामात सातत्य ठेवावे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी तत्काळ मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीष बैजल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

भरणे यांनी सांगितले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासन 50 हजार रूपये देत आहे. जिल्ह्यात 11355 ऑनलाईन अर्ज आले असून यातील 6193 अर्ज स्वीकारले आहेत. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन-चार अर्ज आले आहेत. यामुळे अर्जाची संख्या वाढत गेली आहे. कुटुंबातील नागरिकांनी एकच अर्ज भरावा. काही जणांनी ऑनलाईन कागदपत्रे उपलब्ध केली नसतील तर त्यांना पुन्हा संधी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

सद्यस्थितीत पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ या तालुक्यात रूग्णसंख्या जास्त वाढत आहे. सध्या 124 ग्रामीणमध्ये तर शहरात 42 असे 166 रूग्ण उपचार घेत आहेत. यातील 79 रूग्ण घरी उपचार घेत आहेत. रूग्णांची लक्षणे सौम्य असली तरी प्रत्येकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

लसीकरणीचा वेग वाढवा

कोरोना रूग्ण कमी होत आहेत, तोपर्यंत लसीकरण करून घेणे फायद्याचे आहे. लसीकरणानंतरही कोरोना लागण होते पण त्याची तीव्रता कमी होते, जीव वाचवण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे, हे जनतेला पटवून द्या. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळू लागली आहे. प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. 15 ते 18 वयोगटातील युवकांना कोवॅक्सीन डोसची मागणी वेळेत नोंदवून उपलब्ध करून घ्यावे. पहिला डोस 30 लाख 60 हजार 928 नागरिकांना दिला असून 87 टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस 20 लाख 93 हजार 148 नागरिकांनी घेतला असून याची टक्केवारी 86 टक्के झाली आहे. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के युवकांना कोवॅक्सीनचा डोस दिला असून लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भरणे यांनी दिल्या.

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेले रूग्ण 5650 आहेत. यातील 1900 रूग्ण इतर जिल्ह्यातील होते. ऑनलाईन अर्ज केलेल्यामध्ये कागदपत्रे राहिलेल्यांना बोलावून घेऊन 90 जणांचे अर्ज पुन्हा स्वीकारले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी दिली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त दिपाली धाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीचा निधी वेळेत खर्च करा – पालकमंत्री

प्रत्येक विभागाने विविध योजनांसाठी दिलेला निधी मार्चच्या अगोदर वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भरणे यांनी दिल्या. जिल्हा परिषद, कृषी, महावितरण यांना आणखी निधी हवा असेल देता येईल, मात्र दिलेला निधी परत जाऊ देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती द्या

पंढरपूर शहरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 100 कामे सुरू आहेत. त्यातील 51 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांना गती देण्याच्या सूचनाही  भरणे यांनी केल्या. शहरातील सुलभ शौचालये, चंद्रभागा नदीवरील पूल, अंतर्गत रस्ते यांची कामे पूर्ण झाली आहेत. संत नामदेव स्मारकासाठी जागा निश्चिती त्वरित करून घ्यावी. तसेच संत चोखामेळा यांचे नियोजित स्मारकाचा प्रस्तावही त्वरित सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

नातेपुते, पिराची कुरोली येथील पालखीतळासाठी लागणाऱ्या जागेसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. जागा करारावर घ्यावी की भूसंपादन करून घ्यावी, हे सरपंच, शेतकरी आणि ग्रामसेवक यांची बैठकीत निश्चित करण्याच्या सूचनाही भरणे यांनी दिल्या. पंढरपूर शहरातील सीसीटीव्हीचा विषय त्वरित मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोकुळ दुधसंघ सतेज पाटलांनी खेचून आणलाच, महाडिक गटाला १७-४ ने दणका !

News Desk

स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर सुदाम मुंडेचा पुन्हा बेकायदेशीर दवाखाना सुरू

News Desk

कोकणातील रिफायणरी प्रकल्पावर शिवसेनेची दुटप्पी भूमिका | नितेश राणे

News Desk