मुंबई । पाणी, शेती, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आपत्ती, महिला आणि हवामान बदल आदी विविध क्षेत्रांवर वातावरणीय बदलांचे परिणाम दिसून येत आहेत. यावरील उपाययोजनांबाबत पर्यावरणपूरक विचारांची ‘पेरणी’ करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
डॉ.गोऱ्हे यांच्या पुढाकाराने संपर्क आणि स्त्री आधार केंद्र संस्थांमार्फत आयोजित दोन दिवसीय ‘मंथन’ परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. या परिषदेत हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये यांची सांगड घालून कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाहतूक, कचऱ्याचे विलगीकरण, हरित क्षेत्र वाढविणे, प्रदूषण कमी करणे या शहरी भागातील समस्यांबरोबर पाणी, शेती आदी ग्रामीण भागातील समस्यांवर वातावरणीय बदलांचा परिणाम दिसून येत आहे. जल, जंगल, जमीन या क्षेत्रातील हवामान बदलांबाबत प्रत्यक्ष कृती करणाऱ्या संस्थांनी या मंथन परिषदेत सहभागी होऊन विचारांची पेरणी केली आहे. या चर्चेतून निघालेल्या मुद्यांच्या आधारे शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या परिषदेत उपस्थित सर्वांमार्फत ई-शपथ घेऊन पर्यावरणपूरक सवय अंगिकारली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या सादरीकरणामध्ये पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी विभागामार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज च्या अहवालानंतर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. वातावरणीय बदल ही वास्तविकता असून ती आपल्या दाराशी आली आहे आणि त्यावर आजच कृती करणे गरजेचे आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, कार्बन शोषून घेणे, रिड्यूस, रिफ्यूज, रियुज, रिसायकल आणि रिकव्हर या पाच मुद्यांचा अवलंब करून जीवनशैलीत बदल करणे, हरित क्षेत्र वाढविणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ऊर्जा, परिवहन, उद्योग, कृषी, नगरविकास आदी संबंधित विभागांच्या साहाय्याने २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन ‘कॉप-२६’ परिषदेत राज्याला ‘प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार’ मिळाल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी शेती आणि वातावरणीय बदलाबाबत माहिती देताना तापमान वाढले तर उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. वातावरणीय बदल आणि लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन संशोधन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या परिषदेत सहभागी झालेल्या विविध क्षेत्रातील संस्थांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींनी शाश्वस्त विकासाच्या १७ उद्दिष्टांवर आधारित जमीन, पोषण आणि शेती, पाणी, ऊर्जा आणि हवेची गुणवत्ता, शिक्षण, आरोग्य, नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती, महिला आणि हवामान बदल या विषयांच्या गटचर्चांच्या माध्यमातून विचारांचे आदान प्रदान केले. आजच्या सत्राचे सूत्रसंचालन स्त्री आधार केंद्राच्या वैशाली वाढे यांनी केले तर संपर्क मेधा कुळकर्णी आणि मृणालिनी जोग, स्त्री आधार केंद्राच्या आश्लेषा खंडागळे यांनी आभार मानले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.