HW News Marathi
महाराष्ट्र

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

मुंबई । उच्च पोषणमूल्य व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा पौष्टिक तृणधान्यांना (Cereals) बळकटी देण्यासाठी मंत्रालयात (Mantralaya) महाराष्ट्र मिलेट मिशनच्या (Maharashtra Millet Mission) शुभारंभ प्रसंगी आयोजित तृणधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांच्या प्रदर्शनास मंत्रालय अधिकारी – कर्मचारी यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांच्या पदार्थांची यावेळी विक्री झाली.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. उच्च पोषणमूल्य व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या, अशा पौष्टिक तृणधान्यांना बळकटी देण्यासाठी तसेच तृणधान्य पिकांचे कमी होत चाललेले लागवड क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान, अर्थकारण उंचवण्यासाठी या तृणधान्यांचा आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे. तोच उद्देश लक्षात घेत कृषी विभागाच्या वतीने दिनांक ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र मिलेट मिशनचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच दिनांक ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या प्रदर्शन विक्रीसाठी स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यास अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.

या प्रदर्शनात २८ बचत गट आणि कृषी प्रक्रिया धारक सहभागी झाले होते. त्यांनी बनवलेल्या नाचणी कुकीज, बाजरी कुकीज, नाचणी बिस्कीट, नाचणी सत्व, नाचणी लाडू, पापड, शेव, ज्वारी रोस्ट लाया, नाचणी चिवडा, नाचणी केक, बर्फी, शंकरपाळी, ज्वारीची चकली, नाचणीचे मोदक, आंबील, ज्वारी पालक वडी, मिक्स ढोकळा, भगर दहिवडे, नाचणी आप्पे आणि कचोरी, ज्वारी उपमा अशा पदार्थाची चवीने उपस्थितांना मोहविले आणि त्या पदार्थांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली.

बदलत्या जीवनशैलीमुळे आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच फास्टफूडमुळे उद्भवणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांवर मात करण्याकरिता पौष्टिक तृणधान्याचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश असणे आवश्यक आहे. कारण तृणधान्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, कार्बोदके मुबलक प्रमाणात असतात तसेच पौष्टिक तृणधान्य ही ग्लुटेन विरहित पचनास हलकी असतात. लहान मुले, महिलांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. त्यामुळेच तृणधान्यापासून बनविल्या जाणाऱ्या विविध पाक कलाकृती या प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

मंत्रालयामध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी काम करत असतात. तसेच महाराष्ट्रातील सर्व भागातून लोक आपल्या कामांसाठी येत असतात. या सर्वांच्या माध्यमातून तृणधान्याचे महत्त्व हे वेगवेगळ्या पाक कलाकृतीच्या माध्यमातून सर्वदूर पोचविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, हा उद्देश गेल्या दोन दिवसात सफल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या प्रदर्शनामध्ये साधारणपणे ११ लाख रुपयांची विक्री झाली.समृद्धी ॲग्रो ग्रुप पुणे ( तात्यासाहेब फडतरे ) यांनी सर्वाधिक विक्री केली. या प्रदर्शनात नाचणी कुकीज, लाडू, बाजरी चिवडा, नाचणी सत्व या पदार्थांना मोठी मागणी असल्याचे दिसले.

जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करावा व आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवावे. महाराष्ट्र मिलेट मिशन हे यशस्वी करावे, असे आवाहन कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

हे प्रदर्शन यशस्वी व्हावे यासाठी मंत्रालयातील कृषी विभागाचे अधिकारी – कर्मचारी, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक आणि इतर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related posts

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा एसटी सोडण्याचे आदेश

News Desk

तो दाढीवाला कोण, आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया पार्टीत – नवाब मलिक

News Desk

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत मिळणार नुकसान भरपाई

News Desk