अकोला। पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त असाच एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम करण्यासाठी ती सज्ज आहे. बिटुमिनस काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती ते अकोला या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाच्या कामाला आजपासून (जून 3) शुभारंभ झाला असून ते मंगळवार (जून 7) पर्यंत सलग पाच दिवस विश्वविक्रम रस्ता बांधकामाचे नियोजन कंपनीने केले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते अकोला जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने आज सकाळी सहा वाजतापासून ते 7 जूनच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये होईल.
गुणवत्ता आणि मानवी सुरक्षितता:
राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. कंपनी जशी नियोजित वेळेत आणि गतीने काम करण्यासाठी सुविख्यात आहे, तशीच दर्जा आणि मानवी सुरक्षिततेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. त्यासाठी कोणत्याही साईटवर त्यांची गुणवत्ता नियंत्रण अभियंते आणि तंत्रज्ञ तसेच सुरक्षितता अधिकारी यांची चमू सतत कार्यरत असते. इतकेच नव्हे तर, रस्त्यांच्या कामाच्या दर्जा नियंत्रणासाठी, सुसज्ज अशी दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा ही उभारलेली असते. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वापरल्या जाणारे मटेरियल आणि करण्यात येत असलेले काम यावर सतत निगराणी ठेवून कामाचा दर्जा राखला जातो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या निर्धारित दर्जाप्रमाणेच हे काम होईल. याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जाते.त्याबाबतीत कसलीही तडजोड स्वीकारली जात नाही.
राजपथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडियाद्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल. त्यासाठी 728 मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. तज्ज्ञ चमूचे कामावर लक्ष राहील. कामाच्या दर्जाची प्रयोगशाळेतून तपासणी देखील करण्यात येणार आहे.
जागतिक विक्रमासाठी अभूतपूर्व तयारी
या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राज पथ टीमने सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. यात प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्वॉलिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअर आणि अन्य कर्मचारी यांची चमू तैनात करण्यात आली आहे. या महामार्गावरच, माना कॅम्प येथे व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली आहे. यात चार हॉट मिक्सप्लांट, चार व्हीललोडर, एक पेव्हर, एक मोबाईल फिडर, सहा टँडेम रोलर, 106 हायवा, दोन न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह 728 मनुष्यबळ कार्यरत असतील. यंत्रसामग्री सतत कार्यरत आणि दोषमुक्त ठेवण्यासाठी टाटा मोटर्सचे पाच इंजिनिअर आणि अन्य पाच अधिकारी येथे तैनात आहेत. ही चमू त्या यंत्रांवर सतत लक्ष ठेवून आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, रस्ता निर्मितीचा हा विक्रम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.
साधनसुविधा
विदर्भातील 45 अंश तापमानांत हा विक्रम करण्यासाठी टीमवर्कच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाणार आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईल. यासाठी अकोला-अमरावती मार्गावर माना येथे सुसज्ज कॅम्प उभारण्यात आला आहे. येथे प्रशासकीय आणि अभियांत्रिकी कक्ष, चांगली निवास व्यवस्था, दर्जेदार भोजन व्यवस्था, वाहन देखभाल दुरुस्ती कक्ष, पेट्रोल व डिझेल पंप इत्यादी व्यवस्था आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकुलीत व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे.
यापूर्वीचे विक्रम मोडणार
राज पथ इन्फ्राकॉनने सांगली-सातारा दरम्यान पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान सतत 24 तास रस्ता तयार करीत विश्वविक्रम स्थापित केला होता. सार्वजनिक कार्य प्राधिकरण-अश्गुल यांनी दोहा कतार येथे यापूर्वी विक्रम नोंदविला होता. यात त्यांनी सुमारे 242 तास म्हणजेच 10 दिवस नॉनस्टॉप बांधकाम करून 25 किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला होता. राज पथ इन्फ्राकॉनने आता तो रेकॉर्ड मोडण्याचा चंग बांधला आहे. लोणी-मूर्तीजापूर दरम्यान विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न राहणार आहे. ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी झाल्यास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त राष्ट्राला समर्पित कार्य
पायाभूत सुविधा विशेषत: रस्ते बांधणी आणि फरसबंदी या क्षेत्रात असे लक्ष्य आजवर कधीच ठेवले गेले नाही. म्हणून राज पथ इन्फ्राकॉनने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त हा अथक प्रयत्न आणि हे यश आपल्या राष्ट्राला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सक्षम आणि गतिमान नेतृत्वाखाली ‘गती-शक्ती’ नावाचा एक भव्य महामार्ग बांधकाम प्रकल्प सुरू केला आहे. या विशाल देशामध्ये लोक वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी एकात्मिक आणि अखंडित, मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी प्राप्त करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड बद्दल
राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड,ही कंपनी भारतातील नामांकित आणि विश्वासार्ह पायाभूत सुविधा कंपन्यांमध्ये प्रशंसित आणि मान्यताप्राप्त अशी कंपनी आहे.आधुनिक बांधकाम यंत्रांच्या सेट-अपच्या सर्व आवश्यक श्रेणींनी सुसज्ज, राज पथ इन्फ्राकॉन टीममध्ये अनुभवी अभियंते आणि मशीन ऑपरेटर यांच्या कुशल आणि अनुभवी मनुष्यबळाचा समावेश आहे. तसेच उद्योगक्षेत्रातील सर्वात योग्य अशा एकसंघ तज्ज्ञांचा उत्साही व्यवस्थापकीय टास्कफोर्स आहे. या बळासह राज पथ इन्फ्राकॉनने प्रकल्प वेळेवर पूर्ण करून आणि सर्वोच्च आणि कठोर गुणवत्ता मानकांचे पालन करून, भारतीय पायाभूत उद्योगात नवीन मानदंड स्थापित केले आहेत.
पायाभूत सुविधांच्या विकासात विशेष, राजपथ इन्फ्राकॉनने आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच अंतर्गत रस्ते, पूल, कालवे, बॅरेजेस आणि धरणांपर्यंतचे विविध प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. राज पथ इन्फ्राकॉनने आठ एचएएम(हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल) प्रकल्पांतर्गत बिटुमिनस काँक्रीटस तथा लवचिक फुटपाथसह 450 किलोमीटरचे राज्य महामार्ग रस्ते आणि पीक्यूसी कठोर फुटपाथ रस्त्यांचे 100 किलोमीटर सिमेंटचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय भारत(MORTH) द्वारे गेल्या 3 वर्षांत भारतात जाहीर केलेले कंत्राटी प्रकल्प हे आधीच वितरित केलेल्या अनेक BOT (बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा) रस्ते प्रकल्पांव्यतिरिक्त आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.