HW News Marathi
Covid-19

राज्यात आजपासून ‘मिशन बिगिन अगेन’चा पहिला-दुसरा टप्पा सुरु, तर काय सुरू-काय बंद असणार ?

मुंबई | राज्य शासनाने ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अजून काही नवीन उपक्रमांना संमती दिली आहे. यासाठी ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील मार्गदर्शक सुचनांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. मिशन बिगिन अगेनचा पहिला आणि दुसरा टप्पा राज्यात आजपासून (५ जून) एकत्रित सुरु होत आहे. त्यामुळे राज्यात आज एकट्या व्यक्तीला खुल्या बागेत जाऊन व्यायाम करता येणार आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजुची दुकाने नियमित वेळेत सुरु राहतील, असा निर्णय आता घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त याचे संनियंत्रण करतील. या व्यवस्थेत वाहतूक नियंत्रण तसेच व्यक्ती व्यक्तींमध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

एमएमआर क्षेत्रातील महापालिका तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिकांमधील कंटेनमेंट झोन वगळून अन्य ठिकाणी आजपासून मोकळ्या जागांमध्ये सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग आदी शारीरिक व्यायामांना काही अटींच्या अधीन राहून संमती देण्यात आली होती. पण आता हे करताना बगिच्यांमधील व्यायामाचे साहित्य, ओपन एअर जीममधील साहित्य, खेळाच्या मैदानावरील स्विंग्ज, बार्स यासारखे साहित्य यांचा वापर करता येणार नाही, असा निर्णय आता घेण्यात आला आहे.

मिशन बिगेन अगेन टप्पा पहिला (५ जून 2020 पासून)

  • बाह्य हालचाली – सायकलिंग / जॉगिंग / धावणे / चालणे यासारख्या वैयक्तिक शारीरिक व्यायामासाठी किनारपट्टी, सार्वजनिक / खाजगी क्रीडांगणे, सोसायट्या/ संस्थांची क्रीडागंणे, उद्याने आणि टेकड्यांवर काही अटी व शर्तींवर सर्वसामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बंद भागामध्ये (इनडोअर) अथवा इनडोअर स्टेडियम मध्ये कोणत्याही कामांना परवानगी देण्यात आलेली नाही.
  • उपरोक्त परवानगी ही सकाळी 5 ते संध्याकाळीच्या दरम्यान असेल.
  • कोणत्याही सामूहिक कामास (ग्रुप अटिव्हिटी) अथवा क्रियेस परवानगी दिली जाणार नाही. तथापि, मुलांबरोबर प्रौढ व्यक्ती देखील असाव्यात.
  • लोकांनी मर्यादीत कालावधीत शारिरीक व्यायामासाठी घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
  • इतर कोणत्याही कामाना अथवा उपक्रमांना परवानगी नाही.
  • लोकांना फक्त जवळपास / शेजारच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची परवानगी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासास परवानगी दिली जाणार नाही.
  • लोकांना गर्दी असलेल्या मोकळ्या जागांना टाळावे, असा सल्ला देण्यात येत आहे.
  • सायकलिंग सारख्या शारीरिक व्यायामावर जास्त भर द्यावा, जेणेकरून सामाजिक अंतर ठेवण्यास आपोआप मदत होईल.
  • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, किटक नियंत्रक (पेस्ट कंट्रोल) व तंत्रज्ञ यासारख्या स्वयंरोजगार करणाऱ्यांनी योग्य सामाजिक अंतर पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कामे करावीत.
  • पूर्व परवानगी/ वेळ ठरवून घेऊन वाहनांची दुरुस्ती व वर्कशॉप सुरू करता येतील.
  • सर्व शासकीय कार्यालये (आणीबाणी, आरोग्य व वैद्यकीय, तिजोरी, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, नगरपालिका सेवा वगळता जे शेवटच्या पातळीपर्यंत गरजेनुसार कामे करू शकतात) हे 15 टक्के कर्मचारी अथवा कमीत कमी 15 कर्मचारी यापैकी जी जास्त संख्या असेल त्या संख्येच्या मनुष्यबळांसह सुरू करण्यात येतील.

मिशन बिगीन अगेन – टप्पा दुसरा (५ जून २०२० पासून)

  • सर्व मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय) ही पी – १, पी – २ बेसिसवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. (रस्ता, गल्ली किंवा एखाद्या क्षेत्रातील एका बाजूची दुकाने ही विषम तारखेला तर दुसऱ्या बाजूची दुकाने ही सम तारखेला खुली राहतील).
  • कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने कपड्यांच्या किंवा तत्सम दुकानांमध्ये ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील याची दुकानदारांनी खबरदारी घ्यायची आहे. ग्राहकांना उभे राहण्यासाठी जमिनीवर चिन्ह तयार करणे, टोकन पद्धती, होम डिलीव्हरी आदींना प्रोत्साहन द्यावे.
  • खरेदीसाठी लोकांनी पायी जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्यतो जवळची दुकाने, मार्केटमध्ये खरेदी करावी. बिगर अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लांबच्या प्रवासाला अनुमती नाही. खरेदीसाठी वाहनांचा वापर करण्यात येऊ नये.
  • सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत दुकान, मार्केट हे प्रशासनाकडून बंद करण्यात येईल.
  • टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, रिक्षासाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, चारचाकी वाहनासाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी तर मोटारसायकलसाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ प्रवासी याप्रमाणे अनुमती असेल.

मिशन बिगिन अगेन – टप्पा क्रमांक 3 (8 जून पासून सुरु होईल)

  • सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के मनुष्यबळासह सुरु करता येतील. इतर कर्मचारी घरी राहून काम करतील. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर यांचे नियम पाळावे लागतील. घरी परतल्यानंतर घरातील वयस्कर व्यक्तींना कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. या अनुषंगाने संबंधित आस्थापनांनी योग्य त्या सूचना/निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना द्यावे लागतील.
  • जी कामे करण्यासाठी बंदी नाही ती सुरु ठेवता येतील. परवानगी असलेल्या कामांसाठी कोणत्याही शासकीय परवानगीची गरज असणार नाही. स्टेडियम आणि खुली क्रीडा संकुले ही व्यक्तिगत कवायती, व्यायामासाठी वापरात येतील. मात्र या ठिकाणी प्रेक्षक वा दर्शकांच्या सहभागावर पूर्णपणे बंदी राहील. इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही बाबीस परवानगी दिली जाणार नाही. सर्व शारीरिक कवायती आणि व्यायाम सामाजिक अंतराचे नियम पाळून करणे आवश्यक राहील.
  • सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे राहील- दुचाकी एक प्रवासी, तीन चाकी किंवा ऑटो रिक्शा – 1 अधिक 2 प्रवासी, चार चाकी वाहन – 1 अधिक 2 प्रवासी.
  • जिल्ह्यांतर्गत बस वाहतुकीला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह अनुमती असेल. तसेच यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे तसेच स्वच्छताविषयक काळजी घ्यावी लागेल.
  • आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बस वाहतुकीला अनुमती नसेल. यासंदर्भातील आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील.
  • सर्व दुकाने, मार्केटस् हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील. गर्दी दिसल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाकडून सदरची दुकाने किंवा मार्केट तातडीने बंद करण्यात येतील.

संबंधित बातम्या

जाणून घ्या…राज्य सरकारची खासगी कार्यालय अन् दुकानांसाठी नवीन नियमावली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकही लॉकडाऊन ! उद्यापासून १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

News Desk

शाळा नाही तरी जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे !

News Desk

“महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार का?”, आरोग्यमंत्री म्हणतात…

News Desk