HW News Marathi
महाराष्ट्र

गोष्ट एका राजाची अन सरकारच्या पारदर्शकतेची!

मुंबई | विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सरकारच्या पारदर्शक कारभाराची चांगलीच चिरफाड केली. हे सरकार पारदर्शक कारभाराचा आव आणते. मात्र जनतेच्या मनात केव्हाच या सरकारचे वस्त्रहरण झाल्याचे विखे पाटील म्हणाले.

विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरूवात करताना विखे पाटील यांनी एका राजाची कथा सांगून राज्य सरकारच्या पारदर्शक कारभारावर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, एक राजा होता. त्याला भरजरी, तलम आणि खास शिवलेली वस्त्रे घालण्याचा फार शौक होता. एकदा राजा राज्यात दवंडी पिटतो की, यंदा त्याला वाढदिवसानिमित्त आजवर जगात कोणीही परिधान केली नसतील इतकी तलम वस्त्रे घालायची आहेत. ती इतकी तलम असावीत की, अगदी पारदर्शक असली तरी चालतील.

जो कोणी विणकर अशी तलम व पारदर्शक वस्त्रे विणून देईल, त्याला राजाकडून ‘मुहमांगे इनाम’ दिले जाईल. परंतु, अनेक दिवस दवंडी पिटल्यानंतरही राजाला हवी असलेली वस्त्रे बनवून द्यायला कोणीही विणकर पुढे आला नाही. राजा पुन्हा-पुन्हा दवंडी देत राहिला आणि बक्षिसाची रक्कम वाढवत राहिला. शेवटी एक विणकर समोर आला. त्याने अतिशय तलम व पारदर्शक वस्त्रे विणून देण्याचे आव्हान स्वीकारले. पण विणकराने तीन अटीही घातल्या. पहिली अट अशी की, राजाने त्याला एक मोठा कारखाना बनवून द्यावा, जिथे तो खास वस्त्रे विणण्याचे काम करेल. पण त्या कारखान्यात विणकराशिवाय अन्य कोणालाही प्रवेश करता येणार नाही.

दुसरी अट अशी की, वाढदिवसाच्या दिवशी तो विणकर स्वतः राजाला ती वस्त्रे घालून देईल. आणि तिसरी व शेवटची अट म्हणजे, ज्याला कोणाला ही वस्त्रे पारदर्शक व तलम वस्त्रे दिसणार नाहीत, त्याचा शिरच्छेद केला जावा. राजाने या तीनही अटी मान्य केल्या आणि त्या विणकराला अगदी पारदर्शक असलेली तलम वस्त्रे बनवण्याची परवानगी दिली. विणकराच्या अटीनुसार राजाने एक कारखाना उभा करून दिला. त्याठिकाणी देशोदेशीतून विविध प्रकारचे उंची रेशीम ढिगाने आणले गेले आणि तो विणकर एकांतात, अहोरात्र राजाची खास वस्त्रे विणायचे काम करू लागला. दुसरीकडे संपूर्ण राज्यात उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

ती वस्त्रे कशी असतील? त्यामध्ये आपला राजा कसा दिसेल? अशी चर्चा प्रजेत झडू लागली. अखेर राजाचा वाढदिवस आला. विणकर एका मोठ्या तबकात तलम वस्त्रे घेऊन उभा होता. ती इतकी तलम होती की, पूर्णतः पारदर्शक होती. राजा खुष झाला. विणकराने अत्यंत नाजूकपणे राजाला ती वस्त्रे घालून दिली. मग विणकराने स्वतःच त्या वस्त्रांची प्रचंड स्तुती केली आणि त्या वस्त्रांमध्ये राजाचे सौंदर्य, त्याचा भारदस्तपणा कसा उठून दिसतो, याचे रसभरीत वर्णन केले. मग राजाची मिरवणूक निघाली. राजा ती अत्यंत तलम व पारदर्शक वस्त्रे घालून रथावर आरूढ झाला. मग तो रथ राजधानीतील प्रमुख रस्त्यांवरून पुढे निघाला.

राज्यातील जनता दुतर्फा उभी राहून राजाचे अभिनंदन करत होती. राजाही मोठ्या आनंदाने त्यांचे अभिवादन स्वीकारत होता. पण प्रत्यक्षात त्या विणकराने राजाला काहीच घातलेले नव्हते. तलम आणि पारदर्शक वस्त्रांच्या नावाखाली राजा वस्त्रहिन अवस्थेत फिरत होता. आपली वस्त्रे पारदर्शक असल्याचे समजून स्वतःची शोभा करून घेत होता. जनतेला हे कळत होते.

पण ज्याला ही वस्त्रे दिसणार नाहीत, त्याचा शिरच्छेद करण्याची अट असल्याने कोणी बोलायला तयार नव्हते. सरकारच्या पारदर्शक कारभाराची सुद्धा हीच स्थिती आहे. या सरकारला वाटते की, त्यांचा कारभार फार पारदर्शक आहे. ते तसा आवही आणतात. पण जनता जाणते की, ज्याला हे सरकार पारदर्शकता म्हणते, ती पारदर्शकता प्रत्यक्षात नाहीच. खरे तर या सरकारच्या अंगावर आपली अब्रू वाचवायला सुद्धा वस्त्रे शिल्लक राहिलेली नाहीत, या मार्मिक शब्दांत विखे पाटील यांनी सरकारची पोलखोल केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार

News Desk

पंजाबमध्ये काँग्रेस हायकमांडचा मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश!

News Desk

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

News Desk