HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे ‘फॅमिली डॉक्टर’बनून उध्दव ठाकरे झोकून काम करतायत!

मुंबई | मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. लोकांना हिंमत देण्याचे आणि संकटाशी लढण्याचे आत्मबळ देण्याचे काम फॅमिली डॉक्टर बनून मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. त्यांचे हात मजबूत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या (११ मे) अग्रलेखात कोरोना रुग्णसंख्येत झालेली घट याबाबतचे भाष्य करण्यात आले आहेत.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

कोरोनाचा परिपूर्ण अभ्यास आणि त्यानुसार प्रभावी उपायांची काटेकोर अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्र करीत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राला धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. लोकांना हिंमत देण्याचे व संकटाशी लढण्याचे आत्मबळ देण्याचे काम फॅमिली डॉक्टर बनून मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. त्यांचे हात मजबूत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोविड-19, कोरोना संकट व उपाययोजना’ यासंदर्भात केलेले सखोल अध्ययन महाराष्ट्राच्या कामी येत आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्याची एक खासियत असते. कोणी शिक्षण क्षेत्रात, कोणी शेती किंवा सहकारात, कोणी अर्थ क्षेत्रात पारंगत असतात. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाशी लढा व त्याबाबत जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यातच ‘नैपुण्य’ प्राप्त केले असून आज संपूर्ण देशाला त्याचीच गरज निर्माण झाली आहे. देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकीय आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत होते तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाशी कसे लढावे याबाबत तज्ञांशी सतत संवाद साधत होते.

जगभरातील प्रसिद्धी माध्यमांत हिंदुस्थानातील प्रेतांचा खच, स्मशाने आणि कब्रस्तानांतील चेंगराचेंगरी याबाबत वार्ता आणि मन हेलावून टाकणारी छायाचित्रे रोजच प्रसिद्ध होत आहेत. त्यात महाराष्ट्र दिसत नाही याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच नाही द्यायचे तर कोणाला द्यायचे? कोरोनाच्या लढय़ात ठाकरे यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सामील करून घेतले आहे. आता त्यांनी ‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मैदानात उतरवली आहे. कोरोना काळात फॅमिली डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना ‘माझा डॉक्टर’ बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुचवले आहे. मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टरांशी संवाद साधून त्यांनी कोरोना रोखण्याच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. मुंबईप्रमाणेच राज्यभरातील ‘फॅमिली डॉक्टर्स’ मंडळीनाही त्यांनी हेच आवाहन केले.

उद्धव ठाकरे यांचे हे पाऊल महत्त्वाचे आहे. देशभरात, राज्याराज्यांत वैद्यकीय सुविधा साफ कोलमडून पडल्या असताना उद्धव ठाकरे महाराष्ट्रात मिळेल त्या मार्गाने व साधनांनी वैद्यकीय सुविधा निर्माण करीत आहेत. देशात या क्षणी डॉक्टरांची,परिचारिकांची कमतरता आहे. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे प्रशासकीय सेवेतील निवृत्त डॉक्टर्स व लष्करातील डॉक्टरांना नागरी आरोग्य सेवेसाठी पाचारण करावे लागले. यावरून देशात कोरोना महामारीने काय भयंकर हाहाकार माजवला आहे, याची कल्पना येऊ शकेल. केंद्र सरकार जे आता करू इच्छित आहे त्याची सुरुवात महाराष्ट्राने आधीच केली व महाराष्ट्र करीत असलेल्या अनेक प्रयोगांची प्रशंसा आंतरराष्ट्रीय पातळीवरही होत आहे. मुंबईतील कोरोना संक्रमणाचा आकडा 8 टक्क्यांनी खाली घसरला आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होत आहे.

‘फॅमिली डॉक्टर्स’वर जबाबदारी टाकण्याचा हेतू तोच आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त धोका लहान मुलांना आहे. लहान मुलांना तिसऱ्या लाटेच्या विळख्यात आणि तडाख्यात सापडू देऊ नये, हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने मुलांसाठी स्वतंत्र जम्बो कोविड सेंटर्स, आयसीयू बेड, निओनेटल व्हेंटिलेटर्स व्यवस्था आतापासून करण्यात आली आहे. याच बाबतीत मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टरांबरोबरच हजारभर ‘फॅमिली डॉक्टरां’शी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले की, ‘आतापासूनच लहान मुलांवर लक्ष द्या. मुलांमध्ये आढळणारे जे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप, खोकला, डायरिया, दूध न पिणे, भूक न लागणे या लक्षणांकडे खास लक्ष द्या,’ अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. हे एका कुटुंबप्रमुखाचेच लक्षण आहे. ऑक्सिजन, लसीकरण यावर मुख्यमंत्री जातीने लक्ष ठेवून आहेत.

मुख्यमंत्र्यांनी उगीचच हिंडणे, फिरणे बंद केले. फालतू राजकारणाचे लॉक डाऊन करून संपूर्ण लक्ष कोरोना निवारण कामावरच केंद्रित केले. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनाही महाराष्ट्राची पाठ थोपटण्याचा मोहआवरता आला नाही. दुसऱया महायुद्ध काळात महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. कोटणीस हे जीवाची पर्वा न करता चीनमध्ये आरोग्य सेवा करण्यासाठी गेले. त्या डॉ. कोटणीसांची परंपरा महाराष्ट्र आजही सांगतो. महाराष्ट्राला सेवेची आणि त्यागाची परंपरा आहे. कोरोनाची दुसरी लाट इतकी भयंकर झाली आहे की, अनेक बाधितांना बेडबरोबरच ऑक्सिजनसाठी झगडावे लागत आहे. हे वातावरण देशात असताना महाराष्ट्राने ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंसिद्ध होण्यात यश मिळविले आहे. काही काळापूर्वी राज्यातील स्थिती चिंताजनक होती.

आता ती नियंत्रणात व आशादायक झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या डोक्यात फक्त कोरोना नियंत्रणाचे व लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचेच विचार घोळत असतात. शेवटी कोणत्याही संकटाशी लढताना आधी त्या संकटाचा संपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आणि प्रभावी ठरते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाचा सर्व बाजूंनी आणि बारकाईने जेवढा अभ्यास केला आहे तेवढा अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केला असावा, असे त्या त्या राज्यांतील कोरोनाच्या गंभीर स्थितीवरून वाटत नाही. कोरोनाचा परिपूर्ण अभ्यास आणि त्यानुसार प्रभावी उपायांची काटेकोर अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्र करीत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे.

मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राला धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. लोकांना हिंमत देण्याचे व संकटाशी लढण्याचे आत्मबळ देण्याचे काम ‘फॅमिली डॉक्टर’ बनून मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. त्यांचे हात मजबूत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’विरुद्ध काँग्रेसच्या ‘महापर्दाफाश सभा’

News Desk

महाराष्ट्रात आता भाजप एकट्याने लढेल, पुन्हा फसवणूक नकोय! – चंद्रकांत पाटील

News Desk

ओबीसी आरक्षणासाठी जूनमध्ये बांठिया समितीचा अहवाल मांडणार! – अजित पवार

Aprna