HW News Marathi
महाराष्ट्र

मातोश्री ते पंढरपूर, मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरकडे रवाना

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले.उद्या (२० जुलै २०२१) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज (१९ जुलै)  दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला.

मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे.

मुख्यमंत्री आज मध्यरात्री पंढरपूरच्या मंदिरामध्ये आषाढीच्या पुजेआधी होणाऱ्या पुजेसाठीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पहाटे दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहामधून रुक्मिणी मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर ते २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होती. रात्री २.२० मिनिटांनी होणाऱ्या शासकीय महापुजेस ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने रावाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्या सोबत पोलिसांच्या बऱ्याच गाड्याही आहेत. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून त्यांच्या ताफ्यासोबत असणाऱ्या वाहनांची माहितीही सोलापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.

मागील वर्षी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला गेले शासकीय पुजेसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच गाडी चालवली होती. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. आठ ते नऊ तास गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील वर्षी अशाचप्रकारे रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपूरात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडली होती. अशाचप्रकारे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले आहेत.

कोरोनाच्या सुरूवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतःच गाडी चालवत मंत्रालय आणि इतर भेटींच्या ठिकाणी जाताना दिसून आलं. मंत्रालयात होणाऱ्या बैठकांनाही मुख्यमंत्री स्वतःच गाडी चालवत हजर राहतात. मे मध्ये आमदारकीची शपथ घेतली. त्यावेळी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळीही ते स्वतः गाडी चालवत असल्याचं बघायला मिळालं होतं.

मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार आहेत. आज मुंबई आणि पुणे परिसरात अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब यांच्या मुंबई ते पंढरपूर प्रवासासाठी रस्ते वाहतूक पावसाच्या परीस्थितीचा अंदाज घेऊनच मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवास निश्चित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत आहेत त्यांच्या शेजारी पत्नी रश्मी ठाकरे बसल्या आहेत.

मानाच्या पालख्या बसने रवाना

आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील  १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कोलते दांपत्याला

आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलतेआणि इंदुबाई केशव कोलते महापूजा करतील. केशव कोलते २० वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. २००० मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. १९७२ पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नवा लूक पाहिलात का?

News Desk

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत राज्यात १ कोटी १० लाख लाभार्थी! – अब्दुल सत्तार

News Desk

#MaharashtraElections2019 : राज्यात सकाळी ११ वाजपर्यंत १७.५० टक्के मतदान

News Desk