रायगड | तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज (२१ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला आहे.
रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी तेथील उपस्थितांशी संवाद साधत कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जास्त फिरत बसण्यापेक्षा जे महत्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत असं सांगितलं आहे.
“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले.
मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं होतं, त्यासंबंधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. “वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज करणार नाही. सरकार त्यांच्यासोबत आहे, जे करता येणं शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
काय म्हणाले होते नितेश राणे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही खरमरीत टीका केली आहे. त्यांचा दौरा फोटो सेशनसाठी आहे असंही ते म्हणाले होते.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते बघा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? मनगटात हिम्मत असावी लागते. नुसता टोप (केसांचा) घालून कुणी हिरो होत नाही (उदय सामंत यांना टोला). सरकारमध्ये वजन लागते. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, मदत आणून दाखवा, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.