मुंबई | “मी जन्माने आणि कर्माने हिंदूच आहे. अगदी लहानपणापासून मी हिंदू धर्माविषयी अभ्यास करत आली आहे. त्यामुळे वेळ आल्यावर मी धर्मानुसारच वागेन, असे वक्तव्य शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर मुंबईत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
उर्मिला मातोंडकर यांनी आज (१ डिसेंबर) मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या सेक्युलर विचारसरणीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर यांनी आपण जन्माने आणि कर्माने हिंदू असल्याचे ठामपणे सांगितले.
सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे. हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. मी आजवर हिंदू धर्माचा बराच अभ्यास केला आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून मी योगसाधना केली आहे. त्यामुळे मला हिंदू धर्माविषयी पुरेशी जाण असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केले.
देव हा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो. त्याप्रमाणेच धर्म हा मनातला आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याविषयी जाहीरपणे बोलण्याची मला गरज वाटत नाही. पण मी गरज पडेन तेव्हा धर्मानुसारच वागेन, असे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले.
बॉलिवूड इंडस्ट्रीने स्वत:च्या बचावासाठी उभे राहिले पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही उभे राहा, मग आमच्यासारखे पक्ष तुमच्या पाठिशी उभे राहतील. बॉलिवूड इंडस्ट्री म्हणजे केवळ तीन-चार कलाकार नाहीत. बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोक मेहनती असतात. एखाद्या प्रोजेक्टमध्ये त्यांचे कोट्यवधी रुपये गुंतल्यामुळे त्यांना बऱ्याचदा बोलता येत नाही, त्यांची कोंडी होते, याकडे उर्मिला मातोंडकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.