HW Marathi
महाराष्ट्र

वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे ?

मुंबई । तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात झालेल्या विषारी वायुगळतीने तिघांचा बळी घेतला. रविवारी ही दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. तारापूरच नव्हे तर डोंबिवली, नवी मुंबईतील तळोजा परिसरातील रासायनिक कारखान्यांमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. गेल्या वर्षी पनवेल तालुक्यातील पोसरी येथील ‘एचओसी’ कंपनीत झालेल्या वायुगळतीने 48 माकडे, कबुतरे आणि अन्य पक्षी मृत्युमुखी पडले होते. जवळील ग्रामस्थांनाही त्याचा त्रास झाला होता. याच महिन्यात तारापूरमधील ‘बजाज हेल्थ केअर’ या कंपनीत 30 कामगारांना वायुबाधा झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नव्हती. कधी कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. रविवारी तारापूरमधील असाच एक ज्वालामुखी उफाळून आला आणि त्याने तिघांचा बळी घेतला. याला विकास म्हणायचे की वायुगळतीचा  ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे? असे प्रश्न चिन्ह  सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीप्रश्न केले आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख

औद्योगिक विकास व्हायलाच हवा. रासायनिक उद्योग ही आजची गरजच आहे, पण त्याचवेळी औद्योगिक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालनही व्हायला हवे. मात्र ते होत नाही. म्हणूनच आपल्या देशातील रासायनिक कारखाने म्हणजे विषारी वायूंचे ‘ज्वालामुखी’च बनले आहेत. कधी कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. रविवारी तारापूरमधील असाच एक ज्वालामुखी उफाळून आला आणि त्याने तिघांचा बळी घेतला. याला विकास म्हणायचे की वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे?

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात झालेल्या विषारी वायुगळतीने तिघांचा बळी घेतला. रविवारी ही दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र नसलेले उत्पादन या कारखान्यात सुरू होते, असे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे. तपासात आणखीही काही उणिवा, दोष, चुका कदाचित समोर येतील, पण तारापूरच नव्हे तर राज्यासह देशभरातील रासायनिक उद्योग असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये थोडय़ाफार फरकाने हेच चित्र दिसते. तारापूर औद्योगिक वसाहतीतील ‘स्क्वेअर केमिकल्स’ या कारखान्यात झालेली दुर्घटना सल्फर डाय ऑक्साइड आणि हायड्रोजन क्लोराइड या विषारी वायूंमुळे झाली. शिवाय ‘वन क्लोरो फोर ब्रोमो ब्युटेन’चे उत्पादन सुरू असताना ही दुर्घटना घडली. मात्र या उत्पादनाचे संमतीपत्रकच कंपनीकडे नव्हते, असे आता सांगण्यात येत आहे. म्हणजे जुन्या संमतीपत्रानुसार हे नियमबाहय़ उत्पादन घेण्यात येत होते. शिवाय रिऍक्टरमध्ये तयार झालेले उत्पादन ज्या गॅल्व्हनाइज पिंपात पाइपद्वारा सोडण्यात येत होते त्यात आधीच कुठले तरी रसायन असावे आणि त्याच्याशी नव्या उत्पादनाचा संयोग झाल्याने रिऍक्शन होऊन ते पिंप फुटले असावे. त्यातून बाहेर आलेल्या विषारी वायूचा संसर्ग झाल्याने तिघांचा मृत्यू झाला असावा असाही एक अंदाज आहे. भोपाळ वायू दुर्घटनेत तरी दुसरे काय झाले होते? जमिनीखालील थंड टाक्यांची साफसफाई करताना

पुरेशी काळजी न घेतल्याने

त्यात राहिलेले पाणीच नंतरच्या भयंकर विषारी वायुगळतीला कारणीभूत ठरले होते. तारापूरच्या दुर्घटनेतील बेफिकिरी तशीच आहे. या औद्योगिक वसाहतीत 300 पेक्षा जास्त कारखान्यांत रासायनिक उत्पादने घेतली जातात. येथील काम ‘जॉब वर्क’च्या स्वरूपात केले जाते, पण या प्रक्रियेत सुरक्षा उपाय आणि नियमांचे पालन तंतोतंत केले जात नाही. त्यातूनच दुर्घटना घडतात आणि काम करणाऱ्यांचे बळी जातात. तारापूरच नव्हे तर डोंबिवली, नवी मुंबईतील तळोजा परिसरातील रासायनिक कारखान्यांमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. गेल्या वर्षी पनवेल तालुक्यातील पोसरी येथील ‘एचओसी’ कंपनीत झालेल्या वायुगळतीने 48 माकडे, कबुतरे आणि अन्य पक्षी मृत्युमुखी पडले होते. जवळील ग्रामस्थांनाही त्याचा त्रास झाला होता. याच महिन्यात तारापूरमधील ‘बजाज हेल्थ केअर’ या कंपनीत 30 कामगारांना वायुबाधा झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नव्हती. कल्याण येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीतही विषारी गॅसच्या गळतीने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. उल्हासनगरदेखील वायूप्रदूषण आणि दुर्घटनांपासून मुक्त नाही. डोंबिवली औद्योगिक वसाहत तर जणू ‘रासायनिक ज्वालामुखी’च्या तोंडावरच वसली आहे. विषारी वायू दुर्घटना, रासायनिक कारखान्यांमधील स्फोट, तेथे पडणारा ‘हिरवा पाऊस’ तसेच जल-वायू प्रदूषणाचा अतिरेक यामुळे डोंबिवलीचा प्रवास भोपाळच्या दिशेने सुरू आहे का, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पुन्हा फक्त या कारखान्यांवरच

वायुगळतीची टांगती तलवार

आहे असे नाही. त्यांच्या वायू आणि जल प्रदूषणाने परिसरातील विहिरी, सांडपाणी आणि भूगर्भदेखील ‘गॅस चेंबर’ बनला आहे. गेल्या वर्षी कल्याणमध्ये विहिरी साफ करताना त्यात उतरलेल्या पाच कामगारांचा विषारी वायूने जीव घेतला होता. ‘मॅन होल’ सफाईसाठी उतरलेल्या सफाई कामगारांचे बळी गेल्याच्या दुर्घटनाही अलीकडे घडल्या. 1984 मध्ये भयंकर भोपाळ वायुकांड घडले. काही हजारांचा बळी त्यात गेला. जे लाखो वाचले त्यांना आयुष्यभर मरणयातना भोगाव्या लागल्या. मात्र नंतरच्या तीन-साडेतीन दशकात आपण ना त्यापासून बोध घेतला ना औद्योगिक सुरक्षा आणि नियम सर्व पातळ्यांवरून काटेकोरपणे पाळले. म्हणूनच तारापूरसारख्या वायू दुर्घटना घडत आहेत. अनेकांचे जीव जात आहेत. अवकाशापासून भूगर्भापर्यंत सगळेच विषारी होत चालले आहे. औद्योगिक विकास व्हायलाच हवा. रासायनिक उद्योग ही आजची गरजच आहे, पण त्याचवेळी औद्योगिक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालनही व्हायला हवे. मात्र ते होत नाही. म्हणूनच आपल्या देशातील रासायनिक कारखाने म्हणजे विषारी वायूंचे ‘ज्वालामुखी’च बनले आहेत. कधी कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. रविवारी तारापूरमधील असाच एक ज्वालामुखी उफाळून आला आणि त्याने तिघांचा बळी घेतला. याला विकास म्हणायचे की वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे?

Related posts

शेतक-याने विहीरीतच उपोषणाला बसला,सात बारावरील बोजा कमी झाला नाही तर, विष पिऊन आत्महत्या करण्याचा इशारा

News Desk

भीमा-कोरेगाव दंगलीबाबत नवा खुलासा

News Desk

14 ऑगस्टला शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

News Desk