HW News Marathi
Covid-19

म्युकरमायकॅासिस म्हणजे काय ? लक्षण काय आहेत ?उपचार कोणते ?

डॉ. अविनाश भोंडवे | करोना विषाणूने बाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये त्यानंतरही हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंडे, मेंदू अशा महत्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडीत अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामध्येच म्युकॉरमायकोसिस या आजाराचे अनेक रुग्ण गेल्या महिन्यात आढळून आले. वैद्यकीय शास्त्राला पूर्वीपासून ज्ञात असलेला हा आजार ‘ब्लॅक फंगस’ किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जातो. आजपर्यंत तसा दुर्मिळ असा हा विकार सर्वसामान्य जनतेला परिचित नसल्याने त्याबाबत एक सर्वव्यापी उत्सुकता आणि अकारण भय निर्माण झाले आहे.

अनिर्बंधपणे अज्ञान आणि भय पसरवणाऱ्या सोशल मिडीयामध्ये हा एक नवा आजार सुरु झाला असल्याचे सांगितले जाते आहे, त्यामुळे याबाबत काही मूलभूत शास्त्रीय माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते.

जगाच्या पाठीवर डोळ्यांनी न दिसणारे अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात. विषाणू (व्हायरस), जिवाणू (बॅक्टेरिया) यांच्या प्रमाणेच बुरशी (फंगस/ मोल्ड्स) हे देखील सूक्ष्म जीवजंतूंमध्ये येतात. विषाणू आणि जिवाणूंप्रमाणेच बुरशीच्याही असंख्य जाती आणि प्रजाती असतात.

म्युकॉरमायकोसिस हा गंभीर बुरशीजन्य आजार असून म्युकॉरमायसेटीस या गटातल्या बुरशीजन्य सूक्ष्मजंतूंमुळे होतो.कुणाला होतो हा आजार?

सध्या जे रुग्ण दिसून येत आहेत, त्यात आधीपासून मधुमेह असलेल्या करोनाबाधित व्यक्तींना त्यांच्या आजाराच्या गांभीर्यावर मत करण्यासाठी जर उपचारादरम्यान स्टीरॉइड्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला असेल तर काही रुग्णात म्युकॉरमायकोसिस उद्भवतो आहे असे दिसून येते. जानेवारी २०२० पासून आजपावेतो महाराष्ट्रात २००, गुजराथमध्ये १००, दिल्लीमध्ये १०० रुग्णांना म्युकॉरमायकोसिस झाल्याची नोंद झाली आहे.

मात्र प्रत्येक करोनाबाधित व्यक्तीला हा होत नाही. तसेच प्रत्येक करोनाबाधित मधुमेही व्यक्तींना स्टीरॉइड्स दिलेले असले तरी होत नाही. कोणत्याही कारणाने ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे अशा व्यक्तींना हा बुरशीजन्य जंतूंचा संसर्ग होतो. मधुमेहासारख्या आजारांमध्ये रुग्णाची प्रतिकारप्रणाली आधीपासूनच मंदावलेली असते. त्यात करोनाबाधित झाल्यावर विषाणूंच्या संसर्गामुळे त्या प्रतिकारप्रणालीवर ताण येतो. या रुग्णांची प्रतिकारप्रणाली स्टीरॉइड्समुळे आणखी दबली जाते. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन हे बुरशीजन्य जंतू संधी साधतात आणि रुग्णाला म्युकॉरमायकोसिस होतो.लक्षणे- तसे पाहता म्युकॉरमायकोसिसचे ६ प्रकार आहेत. नाकामधून मेंदूकडे जाणारा- ऱ्हायनोसेरेब्रल हा प्रकार सर्वात जास्त आढळतो. सध्या याच प्रकारातले रुग्ण जास्त आहेत.

यात रुग्णाला चेहऱ्याच्या एका बाजूला, गालांच्या हाडांवर सूज येते. कमालीचे डोके दुखते, नाक चोंदल्यासारखे वाटून नाकाने श्वास घ्यायला त्रास होतो, ताप येऊ लागतो. काहीवेळेस रुग्णांच्या सुरुवातीला नाकाच्या वरच्या बाजूवर कपाळाच्याखाली किंवा तोंडामध्ये टाळ्यावर काळे व्रण दिसून येतात आणि आजार लगेच गंभीर स्वरूप धारण करतो.

म्युकॉरमायकोसिसचे फुफ्फुसांमध्ये, पोटामध्ये, त्वचेवर, आणि रक्ताभिसरणातून सर्व शरीरभर पसरणारेही प्रकार आहेत.

कसा होतो संसर्ग?

– भारतात आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांच्या निरीक्षणामधून या आजाराचा संसर्ग दोन प्रकारे होत असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

१. हॉस्पिटलमधून– करोनाचा रुग्ण इस्पितळात दाखल झाल्यावर त्याला ऑक्सिजन लावला जातो. सिलिंडरमधून येणारा ऑक्सिजन हा अतिशय कोरडा असतो, तो फुफ्फुसांना आणि श्वासमार्गाच्या आत असलेल्या पातळ अस्तराला इजा पोचवू शकतो. त्यामुळे तो एका पाण्याने भरलेल्या नळीतून बुडबुड्याच्या स्वरूपात आर्द्र केला जातो. या पाण्याच्या नळीला ह्युमिडीफायर म्हणतात. यात खरेतर जंतुविरहित असलेले डिस्टील्ड वॉटर भरणे आवशयक असते. पण क्वचित काही ठिकाणी कामाच्या दबडघ्यात कर्मचाऱ्यांकडून त्यात साधे नळाचे पाणी भरले जात असावे आणि ते पाणी वरचेवर बदलले जात नसावे. त्यामुळे त्यातून बुरशीजन्य जंतू रुग्णाच्या नाकात प्रविष्ट होत असावेत, असा तज्ञांचा कयास आहे.

हॉस्पिटलमधील एअरकंडीशनर्सच्या डक्ट्स वेळोवेळी स्वच्छ आणि निर्जंतुक न केल्यास त्यातूनही म्युकॉरमायकोसिसच्या जंतूंचा प्रादुर्भाव होत असावा असाही अंदाज आहे.

मात्र कोव्हिडच्या काळातदेखील रुग्णालयातील, त्यातील आयसीयुमधील निर्जन्तुकतेबाबत असलेली मार्गदर्शक तत्वे सर्व रुग्णालये कटाक्षाने पाळत असल्याने हा संसर्ग या पद्धतीने क्वचितच होत असावा.

२. रुग्णांच्या घरातून- करोनाचा रूग्ण इस्पितळातून घरी आणल्यावर त्याला घरातील एसी, पडदे, गालिचे किंवा दमट भिंतीमधूनही हा प्रादुर्भाव होऊ शकतो.

निदानोपचार- करोनापश्चात रुग्णाची लक्षणे पाहूनच डॉक्टरांना या आजाराची कल्पना येते. त्यानंतर त्याच्या रक्ताच्या तपासण्या, आजार असलेल्या भागाचे सिटीस्कॅन/ एमआरआय केले जातात, म्युकॉरमायकोसिसमुळे नाकात निर्माण होणाऱ्या द्रावाची किंवा राखाडी रंगाच्या पापुद्र्याची शक्य असल्यास सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्या केल्या जातात आणि निदान पक्के केले जाते.

रुग्णाला अॅम्फोटेरीसिन-बी हे इंजेक्शन शिरेतून दिले जाते.

स्कॅनवरील निदानाप्रमाणे या आजाराने व्याप्त असलेल्या नाकाच्या हाडांची, सायनसेसची आणि डोळ्याची शस्त्रक्रिया करून अंतर्गत भागात निर्माण झालेली बुरशी साफ केली जाते. आजार जास्त पसरलेला असल्यास आणि हाडांमध्ये गेला असल्यास ती हाडे शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकली जातात. डोळ्याच्या बाबतीतही आजार डोळ्यामध्ये पसरला आहे असे दिसल्यास डोळाही खोबणीतून काढला जातो. या रुग्णावर नाक-कान-घशाच्या आणि डोळ्याच्या विशेषज्ञ डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया आणि उपचार करते. बहुतेकदा एकापेक्षा जास्तवेळा शस्त्रक्रिया करावी लागते.

जर रुग्णाला उपचारासाठी वेळेवर रुग्णालयात न आणल्यास हा आजार वाढून मेंदूमध्ये तसेच शरीरात अन्यत्र पसरू शकतो. जागतिक आकडेवारीनुसार म्युकॉरमायकोसिसमध्ये १७ ते ५० टक्के रुग्ण दगावू शकतात.

प्रतिबंध-

करोनामधून बऱ्या झालेल्या मधुमेही रुग्णांना आजारादरम्यान जर स्टीरॉइड्स दिली गेली असतील तर डॉक्टर्स त्यांचे डोसेस हळू हळू कमी करायला सांगत बंद करतात. अनेकदा रुग्ण हॉस्पिटलमधून घरी आल्यावर सर्व औषधे तत्काळ बंद करतात, असे करणे टाळावे.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर साधारणपणे आठवड्याने रुग्णांना पुनर्तपासणीसाठी बोलावले जात असते. ते टाळू नये. अशा तपासणीत करोनापश्चात होणाऱ्या आजारांचीही तपासणी केली जात असते. त्यामुळे या आजारांचे निदान लवकर होऊ शकते.

डिस्चार्ज झालेल्या रुग्णाला अगदी महिन्याभरानेदेखील म्युकॉरमायकोसिस सदृश लक्षणे दिसून आल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

रुग्ण घरी येण्यापूर्वी घराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्यात एसी, पंखे, जाजमे, पडदे, गालिचे, ओलसर भिंती याकडे लक्ष द्यावे.

करोनाच्या उपचारामध्ये स्टीरॉइड्सचा अनावश्यक वापर करू नये, उपचारांसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच त्यांचा वापर कारावा अशा सूचना भारतातील सर्व डॉक्टरांना ठिकठीकाणी दिलेल्या आहेत. पण त्याबरोबरच रुग्णांनी स्टीरॉइड्स दिल्यास अकारण बाऊ करू नये, हा वेगळा आजार आहे अशी कल्पना करून घेऊ नये, तसेच हे स्टीरॉइड्सचे साईडइफेक्ट्स आहेत अशी चुकीची समजूत करून घेऊ नये.

कोणताही आजार काही पाउलखुणा सोडून जात असतो. तशा पद्धतीचाच हा आजार आहे. एकूण बाधित व्यक्तींच्या प्रमाणाकडे पाहिल्यास त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. करोना पूर्ण बरा होतो, पण त्यानंतर काही विकार उद्भवू शकतात त्यामुळे आता माझा आजार संपला मी बरा झालो अशा भ्रमात राहू नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर ५००० प्रवास भत्ता द्या”, भाजपची मागणी

News Desk

आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान, राज्यात एकूण १५ हजार ५२५ रुग्ण

News Desk

देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण नको, पवारांचा राहुल गांधींना सल्ला

News Desk