मुंबई। गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांसकट भाजपाचं आख्खं मंत्रिमंडळच बदलून पूर्णपणे नवंकोरं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं. ‘मला कुणीही हटवू शकत नाही’, असं म्हणणाऱ्या नितीन पटेल यांना देखील डच्चू देण्यात आला. त्यामुळे भाजपामध्ये नेमकं काय घडतंय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करतानाच राज्यातील भाजपा नेत्यांना देखील अप्रत्यक्षपणे इशारा दिली आहे. “मोदी-नड्डांनी अशा धक्का दिला की राजकारणात काहीच अशक्य नाही. रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांना त्यांनी घरी बसवलं. शपथ घेतलेले २४ मंत्री पहिल्यांदाच मंत्री झाले. नितीन पटेल यांच्यासह सर्व जुन्या-जाणत्यांना मोडीत काढून मोदी-नड्डा यांनी गुजरातेत नवा डाव मांडला आहे”, असं यात म्हटलं आहे.
पटेल स्वत:ला हेवीवेट समजत होते
गुजरातमधल्या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याच पक्षाला संदेश दिला असल्याचं यात म्हटलं आहे. “रुपाणी यांच्यामागे अमित शहांचे पाठबळ होते. पण रुपाणी आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाला घरचा रस्ता दाखवून मोदी-नड्डा जोडीने एक जोरकस संदेश स्वपक्षास दिला आहे. नितीन पटेल स्वत:ला हेवीवेट समजत होते. पण नेतृत्वाची घडीच पूर्णपणे बदलून टाकताना पाटीदार समाजाचे नेते नितीन पटेल यांनाही मोडून काढले. हे धाडसाचे काम असले, तरी स्वपक्षात अशी धाडसी पावलं मोदीच टाकू शकतात”, असं यात म्हटलं आहे.
मोदी है तो मुमकीन है
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करतानाच राज्यातील भाजपा नेत्यांना देखील अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात आल्याचं बोललं जात आहे. “मोदी हाच भाजपाचा खरा चेहरा आहे. बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल, तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. २०२४च्या तयारीसाठी त्यांनी साहसी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. गुजरातमध्ये तर सगळी जमीन उकरून किडकी झाडं मुळापासून उपटून टाकली. हाच प्रयोग त्यांची सरकारं नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. मोदी है तो मुमकीन है म्हणायचं ते इथे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
मोदींनी दुरुस्तीचे काम हाती घेतले
दरम्यान, अग्रलेखातून अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “गेल्या काही महिन्यांत एक आसाम सोडले, तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालात तर अमित शाह यांनी जिवाची बाजी लावली. केरळात ई-श्रीधरनसारखा मोहरा कामी लावला होता. पण अमित शाह यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्ष जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला आणि भाजपाला विरोधात बसावे लागले. पश्चिम बंगालातही कपाळमोक्ष झाला. जे. पी. नड्डांच्या माध्यमातून मोदींनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच”, अशा शब्दांत शिवसेनेने मोदींचं कौतुक करतानाच भाजपावर देखील निशाणा साधला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.