मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याबाबत अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काय आहे चित्रा वाघ यांचे ट्विट?
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली आहे.
Home Minister of Maharshtra @AnilDeshmukhNCP Finally Resigns !
Now the question arises that who will be the New Vasooli Minister??
Change of face won't change the Corrupt intentions of the MVA Government.@Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra#AnilDesmukh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 5, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ अद्याप शमलेलं नाही. या प्रकरणात अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान या प्रकरणाचा तपास CBI मार्फत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
आज काय घडलं?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं.
त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टानं अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआयला १५ दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.