HW News Marathi
महाराष्ट्र

जखमी गोविंदांवर राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई । आज दहीहंडी (Dahi Handi Festival) असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल (१८ ऑगस्ट) विधानसभेत केली होती.

त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदा व त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.

मृत व जखमी गोविंदांसाठी सहाय्य

यानुसार गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.

हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव आज असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

Related posts

मराठा आरक्षणावर आज मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात होणार चर्चा

News Desk

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे एक रुपया नाही | सुनिल तटकरे

News Desk

बेळगावच्या त्या वक्तव्यावरून कन्नडिगांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळला

News Desk