HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

पोलिसांच्या अंगावर फेकली दंडाची रक्कम, जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा दाखल

मुंबई | ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जग चिंतेत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांकडून संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन असले तरीही काही जण विनाकारण बाहेर फिरताना आढळतात. याच पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासन सध्या अत्यंत सक्रिय आहे. मात्र, आपली सुरक्षा करणाऱ्या पोलिसांनाच आता अनेकदा लोकांच्या मुजोरीला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी पोलिसांशी वारंवार गैरवर्तणूक होताना दिसत आहे. जुन्नर येथे देखील असाच प्रकार घडला आहे. जुन्नर येथे तपासणी नाक्यावर पोलिसांच्या अंगावर दंडाची रक्कम फेकून मारल्याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात आता जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी प्रभारी सहायक पोलिस अधिक्षक आचल दलाल आणि पोलिस कर्मचारी यांच्याशी वाद घालत पोलिसांच्या अंगावर दंडाची रक्कम फेकून मारली. जुन्नर येथील छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार येथील तपासणी नाक्यावर फॅन्सी नंबर प्लेट असलेली कार पोलिसांनी अडवली. फॅन्सी नंबर प्लेटमुळे पोलिसांनी आशा बुचके यांना दंड भरण्यास सांगितले. यामुळे चिडून आशा बुचके यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. “तुम्ही मला ओळखत नाही का ? तुम्ही माझ्या गाडीची पावती कशी काय करता? मला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांनी फिरण्यास सांगितले आहे. तुम्ही मला अडवणारे कोण ?मी पावती फाडणार नाही”, असे त्या चिडून बोलू लागल्या.

“पावतीची रक्कम तुमच्या खिशातुन भरा मी देणार नाही”, असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर, दंडाची रक्कम पोलिसांच्या अंगावर फेकून ‘हे पैसे मी भिक म्हणुन देत आहे, ते भिक म्हणुन घ्या’, असेही आशा बुचके यांनी पोलिसांना सुनावले व दंडाची पावती न घेताच त्या शिवीगाळ करत तिथून निघून गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आता आशा बुचके यांच्यावर सरकारी कामात अडथळा तसेच संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

महंत भास्करदास यांचे निधन

News Desk

सोनिया गांधी-मनमोहन सिंग यांनी घेतली पी. चिदंबरम यांची भेट

News Desk

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर रामदास आठवलेंची मिश्किल टिप्पणी

rasika shinde