HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे दिमाखदार लोकार्पण

 

राज्यातील पहिलेच स्मारक

कल्याण येथील भगवा तलावाच्या किनारी ब्रॉन्झचा 22 फुटी भव्य पुर्णाकृती पुतळा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

कल्याण – येथील ऐतिहासिक अशा देखण्या भगवा तलावाच्या काठावर, शिवसैनिकांच्या अपूर्व उत्साहात, जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देखण्या स्मारकाचे लोकार्पण शनिवारी झाले.

बाळासाहेबांच्या या स्मारकाच्या लोकार्पणामुळे गेले आठवडाभर कल्याणमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. कोल्हापूरहून सोमवारी बाळासाहेबांच्या 22 फुटी भव्य पूर्णाकृती शिल्पाचे वाजतगाजत, ढोल ताशांच्या गजरात कल्याण नगरीत आगमन झाले होते. तेव्हापासूनच कल्याण नगरी या स्मारकाच्या लोकार्पणसाठी सजू लागली होती.

बाळासाहेबांच्याच आदेशाने 2009 साली तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य पदाधिकारी व शिवसैनिकांनी भगवा तलावाचे सुशोभीकरण केले होते. आज या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, म्युझिकल फाऊंटन, ओपन जिम आदी सुविधा विकसित करण्यात आल्या असून कल्याण डोंबिवली परिसरातील हजारो नागरिकांसाठी दोन घटका विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.

भगवा तलाव परिसरातच प्रबोधनकार ठाकरे यांचे काही काळ वास्तव्य होते. त्यामुळे बाळासाहेबांना या तलावाविषयी विशेष जिव्हाळा आहे. त्यामुळेच याच परिसरात बाळासाहेबांचे देखणे स्मारक उभारण्याचा निर्णय 2013 साली महापालिकेने घेतला आणि गेल्या दोन – अडीच वर्षांमध्ये या ठिकाणी देखणे स्मारक विकासित झाले आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील हे पहिले स्मारक ठाणे जिल्ह्यात झाल्याचे समाधान असल्याची भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

या ठिकाणी संजय सुरे, संताजी चौगुले आदींनी घडवलेला बाळासाहेबांचा 22 फुटी ब्रॉन्झचा भव्य पूर्णाकृती पुतळा असून बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन, आर्ट गॅलरी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं दालन, नवोदित चित्रकारांना चित्र काढण्यासाठी दालन, बाळासाहेबांची भाषणे दृक्श्राव्य माध्यमातून ऐकण्याची सोय अशा अनेक सुविधा याठिकाणी विकसित करण्यात आल्या आहेत. शिवाय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळासाहेबांची प्रतिमा प्रत्यक्ष पाहण्याची सोय देखील याठिकाणी करण्यात आली आहे.

स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मीताई ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, सचिव आदेश बांदेकर, उपनेत्या आ. नीलम गोऱ्हे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, महापौर राजेंद्र देवळेकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, वास्तुरचनाकार शशी प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद यशस्वी

News Desk

पोकरा अंतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

Aprna

“आणखी किती काळ आरक्षण चालणार आहे?”, असा सवाल न्यायालय विचारु कसं शकतं?

News Desk