दारु विक्रेत्यांकरीता रस्ते हस्तांतरणासाठी भोकर नगर परिषदेच्या इतिवृत्तात केली खाडाखोड
उत्तम बाबळे
नांदेड :- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार भोकर शहरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बियर बार,वाईन शाॅप,देशी दारु दुकाने १ एप्रिल पासून बंद झाले आहेत.ही दुकाने परत चालू करण्याकरीता रस्ते हस्तांतरणासाठी भोकर नगर परिसदेत चक्क इतिवृत्तातच खाडाखोड करुन जुन्या तारखेत ठराव झाल्याची बनवाबनवी करण्यात आल्याने विद्यमान व माजी नगराध्यक्ष,विद्यमान व माजी मुख्याधिकारी आणि एका लिपीकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा म्हणून माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्याच अधिपत्त्याखालील भोकर नगर परिषदेच्या एका नगरसेवकाने पोलीसांत तक्रार दिली आहे, तर ४ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत उपरोक्तांविरुद्ध कार्यवाही करुन ही दुकाने चालू करण्याची परवानगी देऊ नये,तसेच ही नगर परिषद रस्ते देखभालीसाठी सक्षम नसल्याने त्यांचे हस्तांतरण करण्यात येऊ नयेत यास्तव विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
१ एप्निल पासून भोकर शहरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व दारु दुकाने बंद झाली आणि ही दुकाने परत चालू करण्यासाठी अनेक पर्याय शोधण्यासाठी दारु विक्रेत्यांनी मोठी अर्थपुर्ण शक्ती पणाला लावली.तसे पाहता भोकर नगर परिषदेचा संपुर्ण कारभार ज्या माजी नगराध्यक्षाकडे व विद्यमान उपनगराध्यक्षांसह काही नगरसेवकांचेही दारु दुकाने असल्यामुळे पर्याची उपाय शोधने त्या सर्वांसाठी काही अवघड नसल्याने रस्ते हस्तांतरणाचा उपाय सहज शोधला गेला आणि चक्क २२ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या नगर परिषदेच्या विशेष सभेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव घेण्यात आल्याचे दर्शविण्यासाठी बैठकीच्या इतिवृत्त पुस्तीकेत खाडाखोड करुन रस्ते हस्तांतरणाचा ठराव घेतल्याचे नमुद करण्यात आले.याच बनावट ठरावा आधारे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विशेष प्रकल्प यांच्याकडून अर्थपुर्ण व्यवहारातून हस्तांतरणास हरकत नसल्याचे प्रमाणित करुन घेण्यात आले.परंतू भोकर शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून ९४ कोटी रुपयाचे उड्डान पुल आणि सिमेट रस्त्याचे काम प्रगती पथावर असतांना ‘ क ‘ दर्जाच्या असक्षम नगरपरिषदेने हे रस्ते आपल्या ताब्यात घेने म्हणजे निव्वळ शासन व जनतेच्या डोळ्यात धुळ फेकल्यागत आहे.ही बाब निदर्शनास आल्यामुळे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण व आ.अमिता अशोकराव चव्हाण यांच्या अर्थात काँग्रसेसच्या अधिपत्त्याखाली असलेल्या या नगर परिषदेतल्या सत्ताधारी नगरसेवक केशव रामा मुद्देवाड यांनी रस्ते हस्तांतरणासाठी इतिवृत्तात खाडाखोड करुन बनावट ठराव शासनास दिल्यामुळे इतिवृत्तात खाडाखोड करण्यात जबाबदार असलेले विद्यमान नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,विद्यमान मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे,माजी तथा तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर व ज्यांच्या हस्ताक्षरात खाडाखोड करुन लिहल्यागेले तो लिपीक अशा पाच जणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा अशी भोकर पोलीसांत तक्रार दिली आहे.तसेच माजी नगराध्यक्षांचे सख्खे चुलत भाऊ तथा सत्ताधारी नगरसेवक सुर्यकांत पाटील चिंचाळकर,बांधकाम सभापती सुवेश पोकलवार,स्वच्छता व आरोग्य सभापती अनिता राम नाईक,नगरसेवक केशव रामा मुद्देवाड यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या बनावट इतिवृत्ताचा दस्तावेज दाखविला आणि त्यांच्या मार्फत विभागीय आयुक्त,तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना एक निवेदन दिले.या निवेदनाद्वारे तात्काळ चाैकशी करुन संबधीतांवर गुन्हा नोंदवावा व दारु दुकानांस परवानगी देऊ नये आणि रस्ते हस्तांतरण करु नयेत अशी मागणी केली आहे.कोट्यावधीचा अर्थपुर्ण व्यवहार या दारु विक्रेत्यांसोबत झालेला असल्याची चर्चा जोर धरत असून दारु दुकाने परत जर चालू झाली तर येथील असंख्य महिला तीव्र आंदोलन करतील असे चित्र दिसत आहे.यामुळे राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण आणि पोलीस प्रशासन या विषयी काय भूमिका घेतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.