HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या बाटलीने दूध पिण्याचा भाजपचा प्रयत्न

एकनाथ शिंदे यांचा सणसणीत टोला

ठाणे – महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या भगव्या झंझावातापुढे विजयाची सुतराम शक्यता नाही, हे लक्षात आल्यामुळे ठाण्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे झाले असून भाजप राष्ट्रवादीच्या बाटलीने दूध पिण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मांजरीने कितीही डोळे मिटून दूध प्यायचा प्रयत्न केला तरी लोकांचे डोळे उघडे असतात. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीची ही अभद्र युती यशस्वी होणार नाही, असा घणाघाती प्रहार शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केला.

शिवसेनेच्या ‘सूर्य’ या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, महापौर संजय मोरे, शहर प्रमुख रमेश वैती आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि उपवन येथे झालेल्या जाहीर सभांमध्ये केलेल्या अनेक दाव्यांचा आणि आरोपांचा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड करत असलेल्या टीकेचा शिंदे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. क्लस्टर डेव्हलपमेंट, मेट्रो, ठाण्यातील उड्डाणपूल, जलवाहतूक अशा अनेक कामांचे श्रेय मुख्यमंत्री स्वत:कडे घेत आहेत. पण मुख्यमंत्री सत्तेवर येण्यापूर्वीच यातील बहुतांश प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. क्लस्टर, मेट्रो, विस्तारित ठाणे स्थानक या प्रकल्पांसाठी कोणी प्रखर संघर्ष केला, हे ठाणेकरांना ठाऊक आहे. ठाण्यासाठी क्लस्टरचा निर्णय २८ फेब्रुवारी २०१४ रोजी झाला होता, त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री नव्हते. ठाण्यासाठी‘एसआरए’ची अधिसूचना ११ सप्टेंबर २०१४ रोजी निघाली, त्याही वेळी मुख्यमंत्रीपदी फडणवीस नव्हते. ठाणे शहरातील तीन उड्डाणपुलांच्या कामांच्या निविदा ठाणे महापालिकेने २०१४च्या सप्टेंबर महिन्यात काढल्या होत्या. त्याही वेळी मुख्यमंत्रीपदी फडणवीस नव्हते. त्यामुळे या तिन्ही प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न जनतेची दिशाभूल करणारा आहे, असे शिंदे म्हणाले.

सत्तेवर येण्यापूर्वीच प्रकल्पांना निधी दिला, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असेल तर सत्तेवर असताना दीड वर्षांपूर्वी कल्याण–डोंबिवलीसाठी जाहीर केलेले साडे सहा हजार कोटींचे पॅकेज अद्याप का दिले नाही, असा घणाघाती सवालही शिंदे यांनी केला.

ठाणे महापालिका आयुक्तांना जीवाची भीती वाटत असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी उपवन येथील सभेत केला होता. आयुक्तांनी थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगितले असताना मुख्यमंत्र्यांनी अद्याप पोलिसांना याबाबत गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश का दिले नाहीत?प्रशासनाच्या प्रमुखालाच सुरक्षित वाटत नसेल तर सामान्य जनतेची काय कथा? हे गृहखात्याचेच अपयश नाही का, असे सवालही शिंदे यांनी केले.

जीतेंद्र आव्हाड यांना डंपिंग, मलनिःसारण, पाणी पुरवठा आदी मुद्द्यांवरून शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेचे मलनिःसारण प्रकल्प कोपरी आणि मुंब्रा येथे सुरू असून विटावा, माजिवडा आणि कोलशेत येथील प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. दिव्यातील डंपिंग बंद करण्याचा निर्णयही शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने यापूर्वीच घेतला असून शिळ येथे वनविभागाच्या जागेत कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभा राहाणार आहे. त्यामुळे जीतेंद्र आव्हाड यांचे आरोप निराधार असल्याची टीका शिंदे यांनी केली. ठाणेकरांसाठी हक्काचे धरण बांधण्याचा शिवसेनेचा निर्धार आहे. तशी तयारीही ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वीच सुरू केली होती. मात्र, आव्हाड कॅबिनेट मंत्री असलेल्या त्यावेळच्या सरकारनेच धरणाचा प्रकल्प ठाणे महापालिकेकडून काढून घेऊन ‘एमएमआरडीए’कडे सोपवला होता. नंतर ‘एमएमआरडीए’ने निधी देण्यास असमर्थता दर्शवली त्यावेळी आव्हाड का गप्प बसले, असा बोचरा सवालही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता तर खेळ सुरु झाला आहे, अर्णब गोस्वामींचा मुख्यमंत्र्याना इशारा

News Desk

“उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याआधी भाजपासोबत आलं पाहिजे” – रामदास आठवले

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

Aprna