HW News Marathi
महाराष्ट्र

विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटेंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

जांबूवंतराव धोटे

  • पिंपरी लासिना इथे उद्या अंत्यसंस्कार

यवतमाळ – स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे आज (शनिवार) निधन झाले. धोटे यांना मध्यरात्री एक वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पहाटे तीन वाजता प्राणज्योत मालवली.

जांबूवंतराव धोटे यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी दहा वाजता यवतमाळ येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यांच्या पिंपरी लासिना या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.

जांबुवंतराव धोटेंच्या निधनाने वेगळ्या विदर्भाच्या आंदोलकांवर शोककळा पसरली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच वेगळ्या विदर्भाचा मुद्दा धोटेंनी आक्रमकपणे मांडला. त्यासाठी आयुष्यभर कणखर लढा दिला. या दरम्यान त्यांना अनेक सहकारी सोडून गेले. तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे त्यांना ‘विदर्भवीर’ असेही संबोधले जात होते. जांबुवंतराव धोटे यांनी 2002 मध्ये विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्राच्या विधानसभेवर 5 वेळा तर लोकसभेवर दोन वेळा ते निवडून गेले होते.

विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला- सुधीर मुनगंटीवार

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला असल्याची भावना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्ती केली आहे. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेली कामगिरी बघता त्यांच्यातील कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आपल्याला ठळकपणे दिसतो.

अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात धोटे यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला होता. पण त्यांनी पदवीचे शिक्षण अर्धवट सोडले. पुढे यवतमाळच्या नगर परिषद शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून करिअरला सुरूवात केली. तत्कालीन आमदार व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब घारफळकर यांच्या माध्यमातून त्‍यांना ही नोकरी मिळाली होती.

धोटे यांनी अल्पावधीतच नोकरीला रामराम केला. जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध यवतमाळच्या नगर परिषद वॉर्ड क्रमांक 12 मधून त्‍यांनी निवडणूक लढवली. दर्डांचा पराभव करून राजकीय मैदानात काँग्रेसचा विरोधक म्हणून उडी घेतली होती.जांबुवंतराव धोटे यांची ही उडी राजकीय किरकिर्दीत अत्‍यंत मोलाची ठरली. पुढे त्‍यांनी वसंतराव नाईकांसारख्या अकरा वर्ष मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या बलाढ्य नेत्‍याला सळो की पळो करून सोडले होते. अल्‍पावधितच जांबुवंतराव हे नाव लोकांच्‍या हृदयावर कोरले गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज अत्याधुनिक करण्यावर भर! – ॲड. राहुल नार्वेकर

Aprna

देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचे नेतृत्व,कर्तृत्व, त्याग, बलिदानाचे योगदान सर्वाधिक – अजित पवार

News Desk

पंढरपुरातून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला आग

News Desk