HW News Marathi
मुंबई

पुणे जिल्ह्यातील नवीन विमानतळासाठी आवश्यक परवानग्यांचे काम सहा महिन्यात पूर्ण करणार- मदन येरावार

मुंबई पुणे येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे पर्यटन आणि सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

पुणे जिल्हयातील आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात केलेल्या कार्यवाहीबद्दल विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री येरावार बोलत होते.

राज्यमंत्री श्री. येरावार म्हणाले की, सन 2005 पासून पुणे येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याबाबतचे प्रयत्न सुरु आहेत. याअनुषंगाने पुणे येथे योग्य जागेची निवड करण्याकरिता पुणे जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर, खेड, कोये गाव या ठिकाणांची पाहणी राज्य शासन आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामार्फत करण्यात आली. या पाहणीदरम्यान या चार ठिकाणी विमानतळ उभारणे सुयोग्य होणार नाही, असे निर्दशनास आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासन आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्यामार्फत 11 सप्टेंबर 2016 रोजी पुणे जिल्ह्यातील 6 ठिकाणांची पाहणी करण्यात आली. तसेच या सहाही ठिकाणांचा पाहणी अहवालही सादर करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण, पारगांव मेमाणे, राजेवाडी, ताम्हणेवाडी, नायगांव, कोलविरे-नव्हाळी या सहा ठिकाणांची पाहणी केल्यानंतर पुरंदर येथील मुंजेवाडी-पारगांव मेमाणे या गावातील एक ठिकाण विमानतळ विकासासाठी योग्य असल्याचे प्राथमिक मत नोंदविण्यात आले आहे. पुणे शहरापासून या ठिकाणाचे हवाई अंतर 28 किमी आहे.

पुरंदर येथील जागेबाबत केलेल्या पाहणीच्या अनुषंगाने प्राथमिक अहवाल भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कळविला आहे. सदर जागेच्या ठिकाणी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत सर्व्हे आणि अभ्यास करण्याचे काम सुरु आहे. विमानतळाच्या कामाबाबत कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. पुणे येथे होणाऱ्या नवीन आंतराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रस्तावित पुरंदर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथील स्थानिक लोकांना रोजगार मिळणार असल्याचेही येरावार यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतमाता चित्रपटगृहासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

swarit

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची रेस्क्यू टीम अवनीच्या शोधात

News Desk

हे आहेत यंदाच्या नवरात्रीचे ९ रंग

News Desk