HW News Marathi
मुंबई

माझा मित्र येतोय,फडणवीस

अहमदाबाद : काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणेंनी भाजप प्रवेशाच्या शक्यता धुडकावून लावल्या असल्या, तरी अहमदाबादमध्ये अमित शाह- देवेंद्र फडणवीस- नारायण राणे या त्रयीची भेट घडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अहमदाबादमधील तिघांच्या भेटीचा घटनाक्रमच सूत्रांनी उलगडून सांगितला आहे. त्यानुसार ‘माझा मित्र येतोय’ असं फडणवीसांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर साक्षात राणेच समोर उभे ठाकल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नारायण राणे यांनी अहमदाबादेत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त धुडकावून लावत दृश्यांनाच आव्हान दिलं आहे. मात्र उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार अहमदाबादेतील शाहांच्या निवासस्थानी राणे पितापुत्र आणि फडणवीसांची तासभर चर्चा रंगली.

अमित शाह यांचा एकुलता एक मुलगा जय यांची पत्नी ऋषिता यांनी नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. आजोबा झालेले अमित शाह नातीला पाहण्यासाठी परवा अहमदाबादला आले होते. त्यातच मुख्यमंत्र्यांचा अहमदाबाद दौरा ठरला. फडणवीसांना आपला दौरा गुप्त ठेवला होता. म्हणजेच गुजरात सरकारला याबाबत कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आली नव्हती.

प्रोटोकॉल विभागाला या दौऱ्याची कोणतीही माहिती नसताना गुप्तचर विभागाला फडणवीसांच्या दौऱ्याची वार्ता हाती लागली. त्यानंतर तातडीने सुरक्षा व्यवस्था आणि गाड्यांच्या ताफ्याची व्यवस्था करण्यात आली. सामान्यपणे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी वापरला जाणारा ताफाच मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.

फडणवीस विमानतळावरुन थेट शाहांच्या निवासस्थानी जाणार होते. शाहा अहमदाबाद शहरातील थलतेज परिसरातल्या रॉयल क्रिसेंट सोसायटीमध्ये राहतात. मात्र विमानतळावरुन निघाल्यानंतर त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सर्किट हाऊस एनेक्सीकडे गाडी वळवण्यास सांगितलं. हे सर्किट हाऊस म्हणजे राज्याचं अतिथीगृह आहे. फडणवीसांनी अचानक कार्यक्रमात बदल केल्याने सुरक्षा अधिकारीही चक्रावून गेले. मात्र माझा एक मित्र येणार आहे, त्याच्यासोबत मी येईन, असं फडणवीसांनी सांगितलं.

थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांचा मित्र सर्किट हाऊसला हजर झाला. मात्र हा मित्र दुसरं-तिसरं कुणी नसून साक्षात नारायण राणे होते. राणेंसोबत आमदार नितेश राणेही होते. फडणवीसांसोबत नारायण राणे स्कॉर्पिओत बसले. ही स्कॉर्पिओ गुजरात सरकारकडून देण्यात आली होती. मधल्या सीटवर नारायण राणे आणि मुख्यमंत्री विराजमान झाले. ड्रायव्हरच्या बाजूला नितेश राणे बसले.

फडणवीस, राणे आणि नितेश हे अमित शाहांच्या घरी दाखल झाले. राणे आणि शाह यांची भेट गुप्त राखण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु होते. मात्र गाड्यांचा ताफा दिसताच मीडियाचे कॅमेरे वळले. मुख्यमंत्री गाडीतून उतरले आणि कॅमेऱ्यांमध्ये ते कैद झाले. नारायण राणे आणि नितेश राणे मात्र गाडीतच बसून राहिले. गाडी थोडे पुढे अंधाराच्या दिशेने उभी करण्यात आली. तिथून गुपचूपपणे राणे पितापुत्र शाहांच्या घरी आले.

रात्री दहाच्या सुमारास भेटीगाठी सुरु झाल्या. जवळपास तासभर ही चर्चा चालली. त्यानंतर फडणवीस विमानतळाकडे रवाना झाले. चार्टर्ड विमानाने ते मुंबईला परतले. मीडियाचे कॅमेरे गेल्यानंतर राणे पितापुत्रांनी काढता पाय घेतला. त्यानंतर दोघं हॉटेल हयात रिजन्सीला रवाना झाले. अहमदाबाद शहरातील आश्रम रोड परिसरातल्या या हॉटेलात राणेंनी संध्याकाळी चेक इन केलं होतं. राणे गोव्याहून थेट अहमदाबादला आले होते.

गुप्त बैठकींचं सत्र संपल्यानंतर सकाळी पावणेसातच्या विमानाने राणे पितापुत्र मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर राणेंना पत्रकारांनी गाठलं आणि प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी मी वैयक्तिक कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का, असा सवाल त्यांनी विचारला. राणे गेल्यानंतर दोन तासांनी अमित शाह अहमदाबादहून निघाले.

सुत्रांच्या माहितीनुसार ही बैठक दिल्लीतच होणार होती. मात्र नातीला पाहण्यासाठी शाह अहमदाबादला निघाले. त्यामुळे दिल्लीतल्या 11 अकबर रोड या सरकारी निवासस्थानी होऊ शकणारी बैठक शाहांच्या घरी झाली. फडणवीस शाहांना शुभेच्छा देण्यासाठीच अहमदाबादला गेल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे गुपचूप आलेले राणे, प्रोटॉकोल चुकवून अहमदाबादला गेलेले फडणवीस आणि नातीला पाहण्यासाठी दाखल झालेले शाह अशा त्रयीची चर्चा अखेर झाली.

भाजपकडून आपल्याला ऑफर आहेच, मात्र आपण त्याविषयी विचार केलेला नाही, असा दावा करणाऱ्या नारायण राणेंना पक्षात घेणं शाहांना का आवश्यक वाटतं? असा प्रश्न विचारला जातो. त्याचं कारण म्हणजे अमित शाहांना एका दगडात दोन पक्ष्यांना निशाणा करायचं आहे. एकीकडे काँग्रेस अधिक कमकुवत होईल, तर दुसरीकडे शिवसेनेसमोर भाजपचं पारडं जड होईल. कोणे एके काळी शिवसेनेत असलेल्या राणेंकडे सेनेला रोखठोक उत्तर देण्याची ताकद आहे. त्यामुळे राणेंना पक्षात घेतल्यास ‘चालबाज’ अमित शाहांना राजकीय पटलावर पुढची खेळी खेळणं सोपं जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी अंधारात

News Desk

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग

News Desk

भुजबळांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक रुग्णालयात केल दाखल

News Desk