मुंबई शिवसेनेने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण न करता फक्त घोटाळे केल्याने मुंबईचे वाटोळे झाले असून मुंबईच्या अधोगतीला शिवसेना जबाबदार आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना चव्हाण यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली. चव्हाण म्हणाले की शिवसेनेला पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळे शिवसेना आता युपीए सरकारचे गोडवे गात आहे पण युपीए सरकारने केलेली कामे जनतेच्या समोर आहेत, आम्हाला शिवसेनेच्या प्रमाणपत्राची गरज नाही. या निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील असा अपप्रचार केला जात आहे. ना महापालिकेत ना राज्यात काँग्रेस पक्ष कदापी ही शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही असे चव्हाण म्हणाले.
शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष महापालिकेत एकत्र सत्तेत होते यांनी 2012 सालीचा जाहीरनामा एकत्रीत प्रकाशीत केला होता या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने अद्यापही पूर्ण केली नाहीत. मराठी भाषा भवन, मराठी रंगभूमीभवन बांधण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते पण ते पूर्ण केले नाही. शिवसेना मराठी माणसाच्या नावाने राजकारण करते, पण मराठी माणसाच्या विकासासाठी काहीच करित नाही. शिवसेनेच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात मुंबईतील 37 मराठी शाळा बंद झाल्या आहेत आणि 40 हजार मराठी मुलांनी शाळा सोडली. रस्ते घोटाळा, डम्पींग घोटाळा, पेंग्वीन घोटाळा, टॅब्लेट घोटाळा, नालेसफाई घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांशिवाय शिवसेना भाजपने काही केले नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करून लोकांचे लक्ष विकासाच्या प्रश्नावरून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने मुंबईच्या विकासाची भूमिका मांडली आहे . शिवसेना भाजपचे भांडण हे सत्तेसाठी सुरु असलेली साठमारी आहे, हे जनतेला कळून चुकले आहे, त्यामुळे जनता काँग्रेसलाच निवडून देईल असे चव्हाण म्हणाले.
मुंबईतल्या अनेक जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम भाजप सरकारने सुरु केले असून बिल्डरांच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री अनेक निर्णय घेत आहेत. झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी 4 एफएसआय देण्याचा निर्णय घेतला. गरिबांना मिळणा-या घरांचे क्षेत्रफळ का वाढवले नाही ? मुख्यमंत्र्यांनी म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी हाऊसिंग स्टॉक रद्द करून प्रिमियम चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देखील बिल्डरच्या फायद्याचा आहे. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी चव्हाण यांनी केली.
या पत्रकारपिरषदेत बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुंबईतल्या मराठी माणसाला फसवण्याचे काम शिवेसनेने केले. खंबाटा,असो किंवा सेंटॉर हॉटेल बंद करण्याचे प्रकरण असो मराठी कामगारांना देशोधडीला लावण्यात शिवसेनाच अग्रेसर राहिली आहे. पालिकेत सत्ता आल्यावर शिवसेना भाजपच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची चौकशी करून घोटाळेबाजांना जेल मध्ये पाठवू असे निरूपम म्हणाले.
पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे हे ही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. मुंबईची धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्यासाठी पिपल्स रिपब्लीकन पक्षाने काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली असून ही आघाडी मुंबई महापालिकेत परिवर्तन घडवेल, असे कवाडे म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.