मुंबई – एकेकाळी निळी हाफ पॅण्ट घालून, हाती दांडा घेऊन गुन्हेगारांच्या मागे धावणारा ‘पांडू हवालदार’, आता कालानुरूप बदलला आहे. पोषाख, शस्त्रात्रांसह त्याच्या कार्यपद्धतीतही बदल झाले आहेत. मात्र डोक्यावरच्या टोपीची ठेवण अद्यापही तीच जुन्या पद्धतीची आहे. मुंबई पोलीस दलातील हवालदार, शिपाई या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या पुरातन स्टाइलच्या टोप्या लवकरच बदलण्यात येणार आहेत.
जुन्या टोप्यांमध्ये बदल व्हावा, अशी मागणी सातत्याने कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्याची दखल पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळे शिपायांच्या डोक्यावर दिसणारी होडीच्या आकाराची टोपी जाऊन लवकरच आकर्षक निळय़ा रंगाची ‘कॅप’ दिसू लागणार आहे. दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर हा बदल करण्यात आला असून, त्याला प्रतिसाद पाहून ही टोपी अन्य ठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही पुरवण्यात येणार आहे.
पोलीस दलाचा कणा असलेल्या पोलीस नाईक, शिपाई, हवालदार या अंमलदारांच्या डोक्यावरल्या जुन्या टोपीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. अनेकांच्या डोक्यावर त्या नीट बसत नाहीत. धावपळीत, आरोपीचा पाठलाग करताना किंवा हातघाईच्या प्रसंगात त्या डोक्यावरून सरकतात, खाली पडतात. या तक्रारींची दखल पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी घेतली. टोपी घातल्यावर रुबाब कायम राहावा, योग्यपणे वापर व्हावा हे डोळ्यांसमोर ठेवून नव्या ढंगाच्या टोप्यांचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.
कशी असेल नवी टोपी
गर्द निळा रंग, पिवळ्या रंगाची पट्टी, दर्शनी भागावर मुंबई पोलीस दलाचे बोधचिन्ह, दोन्ही बाजूला मुंबई पोलीस असा ठसा अशी ही नवी टोपी घातलेले अंमलदार शुक्रवारी विधिमंडळ, मरिन ड्राइव्ह परिसरात तैनात होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.