HW News Marathi
मुंबई

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

मुंबई | सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सो लि, सोलापूर या संस्थेने बनावट कागदपत्रे जोडून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत दुध भुकटी प्रकल्पासाठी (दुग्ध व्यवसाय) २४.८१ कोटी अनुदान मंजूर करून घेतलेले आहेत. त्यातील ५ करोड या संस्थेला मिळालेले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली अशी माहिती प्राप्त झालेली आहे. या प्रकल्पासाठी त्यांनी जमीन एन ए ओर्डर, प्रदूषण परवाना, बांधकामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व औषध प्रशासन परवाना, एम एस ई बी परवाना पत्रक, कलेक्टर कार्यालय, कारखाना अधिनियम परवाना, दुग्ध प्रक्रिया, दुग्ध संकलन या सर्व विभागाचे सर्व कागदपत्रे बनावट आहेत.

संबंधित संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सोलापूर यांनी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पत्राद्वारे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, पुणे यांना कळविलेली आहे. लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सो लि, सोलापूर या संस्थेचे दुध प्रक्रिया केंद्र करमाळा, सांगोला, मंगळवेढा, बीबीदारफळ येथील सद्यस्थितीत बंद असल्याचे निदर्शनास आलेले आहे, अशी माहिती मुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला मुंबईकाँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर व महिला अध्यक्ष डॉ अजंता यादव उपस्थित होते.

संजय निरुपम पुढे म्हणाले की सुभाष देशमुख हे वादग्रस्त आणि बदनाम मंत्री असून त्यांची अनेक प्रकरणे याआधी सुद्धा उघडकीस आलेले आहेत. यांच्याकडे नोटाबंदीच्या काळात त्यांच्या गाडीत ९२ लाख रुपये सापडले होते. शेतकर्यांकडून खोटी कागदपत्रे तयार करून सरकारकडून पैसे उकळलेले होते, अग्निशामक दलाच्या जागेवर स्वतःचा बंगला उभारणे, हा बंगला अनधिकृत आहे हे सिद्ध झालेले आहे, SEBI ने त्यांच्याच लोकमंगल अग्रो इंडस्ट्रीजला गैरकारभाराबाबत नोटीस पाठवलेली आहे, असे अनेक घोटाळे केलेले असे हे मंत्री असून त्यांनी सरकारची नेहमीच फसवणूक केलेली आहे. तरी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कारवाई करत नाही. भाजपा नेहमी पारदर्शक कारभाराच्या गोष्टी करते परंतु त्यांच्या मंत्रिमंडळात असे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत. मुख्यमंत्री स्वतः त्यांना का पाठीशी घालत आहेत, हे कळत नाही आहे.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सो लि, सोलापूर या संस्थेवर सुभाष देशमुख अध्यक्ष असतानाच हे खोटे प्रकरण तयार करण्यात आले होते. खोटी कागदपत्रे तयार करून सरकारची फसवणूक केली गेलेली आहे. आता या संस्थेचे अध्यक्ष त्यांचाच मुलगा रोहन सुभाष देशमुख आहे, त्यामुळे आमची अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची व बनावट कागदपत्रांची सखोल चौकशी व्हावी, सुभाष देशमुख आणि रोहन देशमुख यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, या प्रकरणात मुंबई आणि सोलापूर येथील संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा ताबडतोब कारवाई झाली पाहिजे व सखोल चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही सुद्धा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, या प्रकरणाच्या मुळापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.

 

Related posts

विसर्जन मिरवणुकी दरम्यान एकाचा मृत्यू

Gauri Tilekar

आरे मेट्रो कारशेड वाद : पर्यावरणप्रेमींचं मध्यरात्री आंदोलन

News Desk

पश्चिम रेल्वेकडे सहा नवी सेगवे वाहने, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

News Desk