HW News Marathi
मुंबई

मखरांची १८ वर्षांची परंपरा, आता बाप्पासाठी इको फ्रेंडली मखर

मुंबई | यंदाच्या गणेशोत्सवा दरम्यान जर तुम्हाला बाप्पासाठी थर्माकॉलचं मखर किंवा सजावट करण्याचा विचार करत असला, तर तो विचार आताच विसर्जित करा. कारण थर्माकॉलच्या मखरावरची आणि सजावट साहित्यावरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवानगी देणे शक्य नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय आहे.

अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सव हा सण येऊ घातला आहे. सगळीकडेच लाडक्या गणपती बाप्पासाठीची सजावट, तयारी पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकांचा कल इको फ्रेंडली गणपतीची मूर्तीला जास्त पसंती मिळताना दिसू लागली आहे. त्यातच आता बाप्पासाठी इको फ्रेंडली मखर ही सध्या चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध कलाकार नानासाहेब शेंडकर यांनी थर्माकॉल पासून बनविण्यात येणारे मखर बंद करून २००१ साली सर्वांसाठी पुठ्ठ्यांचे मखर हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्यात चक्क कागदापासून ते अगदी सुंदर आणि टिकणारे मखर बनवून देतात. नानासाहेब यांनी २००१ साली ‘उत्सवी’ ही संस्था स्थापन केली. ही संस्था गेल्या १८ वर्षांपासून पर्यावरणपूरक कागदी पुठ्ठ्यांचे फोल्डिंग मखर तयार करत असून त्याचा प्रचार व प्रसार करीत आहेत.

नानासाहेब शेंडकर यांनी स्वतः जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण पूर्ण केले असून ते गेले ४५ वर्ष जाहिरातक्षेत्र, चित्रपट आणि नाट्यक्षेत्रांमध्ये महत्त्वाची कामगीरी करत आहेत. घरगुती गणपतीबरोबरच मंडळांच्या मोठया गणपतींसाठीही ते मखर बनवू लागले. सर्वसामान्यांना परवडावे म्हणून २५० ते अगदी ३००० पर्यंत हे मखर उपलब्ध करून दिले. तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मखरांचा खर्च पंधरा लाख आणि थर्माकोल मखरांचा पाच लाख इतका खर्च येतो. त्या मानाने कागदी मखर स्वस्त दरात उपलब्ध होतात. आणि रेल्वे, बस मधून प्रवासा दरम्यान गावी किंवा कोठेही नेण्यास सोयीस्कर ठरते.

सार्वजनिक मंडळाच्या भव्य सजावटीसाठी यावर्षी उत्सवी संस्थेने २३ फूट उंच सिद्धिविनायक पॅलेस कागदी पुठ्ठ्यांमध्ये साकारलेला आहे. या मखरांची मागणी भारतातच नव्हे तर, जगभरातून वाढत आहे. आपल्यासारखे पुठ्ठ्यांचे मखर इतरांनाही करता यावे, म्हणून गेल्या वर्षीपासून नानासाहेब लहान मुलांना आणि मंडळांच्या मुलांनाही शिकवत आहेत. तसेच एच. डब्ल्यू वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, सुरुवातीला त्रास झाला पण आज १८ वर्षानंतर मागे फिरून पाहतो तेव्हा आनंद होतो. ‘निसर्गाने जे आपल्याला दिले, तेच आपण निसर्गाला परत करूया.’ असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts

रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांची रोज आंदोलने

News Desk

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे फर्मान!

News Desk

इतिहासाची माहिती व्हावी यासाठी चिमुकल्याची ऐतिहासिक वेशभूषा

News Desk