HW News Marathi
मुंबई

दर्जेदार आणि विकासात्मक कामाच्या माध्यमातून मुंबईचा कायापालट! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई । मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी निश्चितपणे करण्यात येतील. प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे केले जाईल. येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई (Mumbai) करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत 500 प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,आमदार ॲड. आशीष शेलार, मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि आशीष शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेकांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम हे शहर करते. सगळ्यांना सामावून घेणारे हे शहर आहे. त्यामुळे या शहरात पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात, असा आमचा मानस आहे. त्यादिशेने आपण काम सुरु केले आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि रिसर्फेसिंग करुन तर महत्वाचे रस्ते काँक्रिटचे करुन किमान 30 वर्ष ते टिकतील. यावर्षी पाचशे किलोमीटर रस्त्यांचे काम हाती घेतले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच स्वच्छता, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर देत आहोत. पाच हजार स्वच्छता दूतांच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यासाठीचे नियोजन तयार आहे. मुंबई शहर एकीकडे विस्तारत असताना कोळीवाडे, तेथील संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम करण्यात येणार आहे. चार महिन्यात महानगरपालिका क्षेत्रात आपण 52 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केल्याचे सांगून येत्या एक दोन महिन्यात मुंबईत दृश्य स्वरूपात बदल पाहायला मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

यावर्षी जी-20 परिषद आयोजनाचा मान आपल्या देशाला मिळाला आहे. त्यानिमित्त मुंबईसह राज्यातील इतर शहरात 14 बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. यानिमित्त परदेशातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींसमोर मुंबई आणि आपल्या राज्याचे ब्रॅंडिग करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. मुंबईकरांच्या हिताचे अनेक निर्णय गेल्या साडेचार महिन्यांत घेण्यात आले. येथील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याशिवाय रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई शहर सौंदर्यीकरण प्रकल्प अतिशय चांगला उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. राज्यात सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विकासाचा आराखडा तयार करण्यास सांगितले. त्यामुळे ते या योजनेचे शिल्पकार आहेत. मुंबई शहरात सर्व सुविधा युक्त आकांक्षीत स्वच्छतागृहे बांधण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच झोपडपट्टी परिसरात स्वच्छतागृहांची अधिकची तसेच पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांडपाण्याच्या नियोजनासाठी कम्युनिटी वॉशिंग मशीन संकल्पना प्रत्यक्षात आणणे,  झोपडपट्टी परिसरात अनेक ठिकाणी वीज नाही तेथे हँगिंग लाईट ही संकल्पना राबविण्याचे नियोजन सुरू आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांचे महत्व जाणून त्याच पद्धतीने त्याची जपणूक करण्यात येणार आहे. स्काय वॉकच्या ठिकाणी एस्केलेटर्स बसविण्यात येतील. आगामी काळात मुंबई या ऐतिहासिक शहरातील वास्तू आणि रस्त्यांचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले,  आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाची वचनपूर्ती होत आहे. विकासाच्या बाबतीत सर्वांना अपेक्षित असलेला बदल आता पाहायला मिळेल, असे ते म्हणाले.

शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, मुंबईला देदीप्यमान इतिहास आहे. तो आणखी वृद्धिंगत करावयाचा आहे. मुंबईत स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. केंद्र सरकारचेही त्यासाठी पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री लोढा म्हणाले, मुंबई शहर ही देशाची आर्थिक राजधानी आहेच. ती आता पर्यटन आणि रोजगार संधी निर्माण करणारी राजधानी व्हावी. त्या दिशेने राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.  आमदार शेलार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक आयुक्त चहल यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ल्याच्या भुयारी मार्गातून प्रवास करताय सावधान !

News Desk

नालासोपारा स्फोटक प्रकरणात गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपींचा समावेश

Gauri Tilekar

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत स्फोट

News Desk