HW News Marathi
मुंबई

मोदींनी देशाला फसवलं – खासदार आनंद शर्मा

चिंता आणि चिंतनाची वेळ असताना कसले उत्सव साजरे करताय? : खा. आनंद शर्मा
शेतकरी संपावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवाः खा. अशोक चव्हाण
फक्त अल्पभूधारक नाही, सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्या.
मुंबई – देशाची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सीमेवर जवान शहीद होतायेत, शेतकरी आत्महत्या करतायेत एवढी चिंताजनक परिस्थिती असताना सरकार कसला उत्सव साजरा करते आहे ?असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतले काँग्रेस पक्षाचे उपनेते आनंद शर्मा यांनी केला आहे.
मुंबई येथे पत्रकारपरिषदेत बोलताना आनंद शर्मा यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, देशात अघोषीत आणीबाणी सारखी परिस्थिती आहे. सरकारविरोधात बोलणा-यांना देशद्रोही ठरवले जात आहे. खोटा प्रचार करून मोदींनी देशाच्या जनतेला फसवलं आहे. 3 वर्षापूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने मोदींनी पूर्ण केलेली नाहीत आणि दररोज नवनव्या घोषणा करतायेत.3 वर्षात 1500 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात आले. सरकारी तिजोरीतून जाहिरातींवर कोट्यवधी रूपये उधळण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला ?असा सवाल शर्मा यांनी सरकारला केला.
मोदी सरकारच्या काळात देशाची अंतर्गत आणि सीमा सुरक्षाही धोक्यात आली आहे. सीमेवर रोज जवान शहीद होत आहेत. भाजप सरकारकडे परराष्ट्र निती नसून कुटनिती म्हणजे फोटो काढण्याची संधी नाही, हे पंतप्रधान मोदींना समजत नाही. कुठलेही निमंत्रण नसताना पंतप्रधान मोदी पाकिस्तानात का गेले? असा प्रश्न त्यांनी मोदी यांना विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बडबोले असून फक्त घोषणा करत राहतात. तीन वर्षात सहा कोटी रोजगाराची निर्मिती करू आश्वासन मोदींनी दिले होते, पण प्रत्यक्षात दहा लाख रोजगाराची तरी निर्मिती झाली का? उलट नोटाबंदीमुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. आमच्या काळात गुंतवणुकीचा दर 34 टक्के होता. आता तो 26 टक्के झालाय. त्यामुळे नव्या नोकऱ्यांची निर्मिती कमी झाली आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नोटाबंदीमुळे उद्योग धंद्यांना फटका बसला आहे. मात्र भाजप दिल्लीत 700 कुठे रूपये खर्च करून कार्यालयाचे बांधकाम करित आहे, हा पैसा कुठून आला?
काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही देशात अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती केली. मोदींनी ज्या सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन केले त्याचे काम मनमोहन सिंग यांच्या काळात सुरू झाले होते. पण ते मान्य करण्याची शालिनता पंतप्रधानांमध्ये नाही. भारतात सगळं काही पहिल्यांदाच होतंय असे दाखवले जातंय. सरकार आकड्यांचे खेळ करून देशाचा विकासदर वाढल्याचे दाखवत आहे. हा फार्स आहे. सरकार फक्त काही उद्योगपतींसाठी काम करित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत केंद्र सरकारने श्वेतपत्रिका काढावी आणि मागील दहा वर्षातील जीडीपीचे आकडे जाहीर करावेत अशी मागणी शर्मा यांनी केली. देशातील शेतकरी अडचणीत असताना मोदी उत्सव साजरा केला जातोय. कर्जमाफी करण्यापासून सरकारला कोणी रोखले आहे. महाराष्ट्रासह देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करून दाखवली आता भाजपाने करून दाखवावी असे शर्मा म्हणाले.
याच पत्रकारपरिषदेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, शेतकरी संपाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाचा शेतकरी संपाला पाठिंबा आहे. संप दीर्घकाळ चालणे योग्य नाही त्यामुळे सरकारने तात्काळ विशेष अधिवेशन बोलवून शेतकरी संपावर आपली भूमिका स्पष्ट करावी. सरकारने अल्पभूधारक आणि बहुभुधारक असा भेद न करता सरसकट राज्यातील सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी. मुख्यमंत्री आणि सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांचा संप फोडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्ष कर्जमाफीचा लढा साततत्याने लढत असून कर्जमाफी घेतल्याशिवाय हा लढा थांबवणार नाही असे खा. चव्हाण म्हणाले.
मुख्यमंत्री राजकारण करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हिंसा करत आहेत असे बेछूट आरोप करित आहेत. त्यांचा आरोप चुकीचा असून गुंड कोणाच्या पक्षात आहेत ? हे भाजपने पहावे. असा टोला खा. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. युपीए सरकारच्या काळात किमान आधारभूत किंमतीत दरवर्षी 14 टक्के वाढ केली जात होती 10 वर्षात किमान आधारभूत किंमत 140 टक्क्यांनी वाढवली होती पण मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या काळात किमान आधारभूत किंमतीत फक्त 1.7 टक्के वाढ झाली आहे. किमान आधारभूत किंमतीत केंद्र सरकार वाढ करत नाही. सततचा दुष्काळा आणि शेतीमालाचा पडलेला भाव यामुळे राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश कोरवाहू शेतक-यांचे शेतीचे क्षेत्र पाच एकरांपेक्षा जास्त आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा म्हणून सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी असे खा. चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा अभ्यास केव्हा संपणार? असा सवाल करित समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनवर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असे खा. चव्हाण म्हणाले.
या पत्रकारपरिषदेला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, खा. रजनीताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे माजी आमदार चरणजीतसिंग सप्रा उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विद्यापीठांमधील व कॉलेजच्या (कॅंन्टीन) सुरक्षा धोक्यात

News Desk

लोकलमधील टोळक्याची जेष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला

News Desk

२०० विद्यार्थ्यांना ठाण्यातील फेक युनिव्हर्सिटीचा फटका, उकळले कोट्यावधी रुपये

News Desk