HW Marathi
मुंबई

श्रावणी सोमवारी मुंबईतील या मंदिरांमध्ये होते भाविकांची गर्दी…

गौरी टिळेकर | श्रावण महिना नुकताच सुरु झालेला आहे! आता श्रावणातली व्रत-वैकल्येदेखील सुरु होतील. श्रावणातील प्रत्येक वाराला एक विशेष असे महत्त्व आहे. या महिन्यातले सर्वात पहिले व्रत म्हणजे श्रावणी सोमवारचे व्रत! विवाहित आणि अविवाहित महिला हे श्रावणी सोमवारचे व्रत करतात. सोमवार म्हणजे शंकराचा वार त्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व शंकराच्या मंदिरांमध्ये अलोट गर्दी पाहायला मिळते. एका विशिष्ट पद्धतीने हि श्रावणी सोमवारची पूजा केली जाते. आपण मुंबईतील अशाच काही प्रसिद्ध शंकर मंदिरांची माहिती घेऊया.

१) वाळकेश्वर मंदिर- मुंबईतील ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या अशा काही वास्तूंमध्ये अनेक मंदिरांचाही समावेश होतो. त्यांपैकीच एक मंदिर म्हणजे मलबार हिल येथे असलेलं १०५० वर्षे जुनं मंदिर, वाळकेश्वर मंदिर! वाळकेश्वर मंदिर हे त्याच्या प्राचीन अशा वास्तुशास्त्रासाठीदेखील प्रसिद्ध आहे. वाळूचा ईश्वर म्हणजे वाळकेश्वर ह्यावरून वाळकेश्वर हे नाव पडले. १७१७ साली आणि त्यानंतर पुन्हा १९५० साली ह्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. पौर्णिमेच्या दिवशी ह्या मंदिरात विशेष गर्दी असते.

२) बाबुलनाथ मंदिर- बाबुलनाथ हे मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकात राजा भीमदेव यांनी बांधले आहे.मरिन लाईन्स जवळील छोट्या टेकडीवर असून आजूबाजूला असलेल्या उंचचउंच इमारतींमुळे हे मंदिर दुर्लक्षित झाले आहे. कालांतराने हे मंदिर जमीनदोस्त झाले होते. परंतु १७८० साली ह्या मंदिराचे काही अवशेष सापडल्याने या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.

३) अंबरनाथ मंदिर – अंबरनाथ म्हणजे स्वर्गाचा अनुभव देणारे स्थळ होय. या मंदिराबाबत अशी दंत कथा प्रचलित आहे कि, हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत एका खडकावर कोरलेले आहे. परंतु ह्यासंबंधी कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. शिलाहार घराण्याचे राजा चित्तराज यांनी हे मंदिराची बांधणी केली अशी इतिहासात नोंद आहे.महाराष्ट्रातील इतर अनेक प्राचीन मंदिरांप्रमाणेच ह्या मंदिराची वास्तुशैलीदेखील हेमाडपंथी आहे.

४) खिडकाळेश्वर मंदिर- खिडकाळेश्वर मंदिर हे कल्याण-डोंबिवलीमधील तेराव्या शतकातील पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे मंदिर आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ह्या मंदिरात दुधाचा अभिषेक बंद केला गेला आहे. ‘पिंडीवर केवळ फुले वाहून, दूध गरजू व्यक्तींना दिले जावे’ असे आवाहन या मंदिर समितीकडून भाविकांना केले जाते. ह्याला भाविकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे.

Related posts

सीएनजी, पीएनजीचे भाव वधारले

News Desk

मुंबई पोलिसांकडून दाऊदच्या पुतण्याला अटक

News Desk

आमदारांनाच गुंडाकडून धमकी – सुनिल प्रभू

Ramdas Pandewad