वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईटहाऊसमध्ये यावर्षी ईद साजरी करण्यात आली नाही. मात्र, व्हाईट हाऊसनं सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिल क्लिंटन, जॉर्ज बूश आणि बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात दरवर्षी व्हाईट हाऊसमध्ये ईदनिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जात होतं. या परंपरेला यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छेद दिलाय.
याआधी प्रत्येक राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात व्हाइट हाऊसचे अधिकारी एक-दोन महिने आधीच इफ्तार पार्टीच्या आयोजनाची तयारी करत असायचे. पण यंदा त्यापैकी एकही गोष्ट व्हाईट हाऊसमध्ये बघायला मिळाली नाही. १८०५ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी व्हाइट हाऊसमध्ये पहिल्यांदा रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र, खऱ्या अर्थाने १९९६ पासून दरवर्षी ही इफ्तार पार्टी देण्याची परंपरा व्हाइट हाऊसने सुरू केली होती. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या काळात ही परंपरा सुरू झाली.
सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन यांनी यावर्षी व्हाइट हाऊस इफ्तार पार्टीचं आयोजन होणार नाही, असं आधीच सांगितलं होतं. ‘ईद हा सण रमजानचा महिना संपल्यावर साजरा केला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात तसंच प्रार्थना आणि दानधर्मसुद्धा करतात.
व्हाइट हाऊसकडून ईदबाबत एक निवेदन जारी करण्यात आलंय. ‘अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिमांनी जगातल्या अन्य भागात राहणाऱ्या मुस्लिमांप्रमाणे रमजानचा महिना आपल्या धर्माच्या शिकवणीनुसार पाळला तसंच शिकवणीनुसार दानधर्म केलं आणि रमजानचा महिना पाळला आहे. आता आपल्या कुटुंबियांसह ते ईद साजरी करतील. मुस्लिम बांधव आपले शेजारी आणि समाजातल्या इतर वर्गातल्या लोकांना अन्न वाटून घेण्याच्या आपल्या परंपरेचं पालनही करतील. यंदा ईदनिमित्त पुन्हा आम्ही दया, सहानुभूती आणि चांगल्या वागणुकीचं महत्त्व लक्षात ठेवू. अमेरिका या मूल्यांच्या सन्मानाशी वचनबद्ध आहे. ईद मुबारक’, असं व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.