HW News Marathi
मुंबई

पुण्यात तिकीटांसाठी अामरण उपोषण

पुणे लोकसभा, विधानसभा निवडणुकानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोदी लाट चालणार नाही असे भाकीत वर्तवण्यात येत असताना, पुन्हा एकदा भाजपा लाट तयार करण्यात यशस्वी झाले. त्याची परिणीती पुन्हा एकदा भाजपामध्ये इतर पक्षातील इच्छुकांचा ओढा वाढला. मात्र सर्वाना उमेदवारी देणे अशक्य असल्याचे माहित असताना देखील, पक्षाने देखील त्यांना प्रवेश दिला. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी नाकारली गेल्यानंतर काही पक्षातील जुन्या आणि नव्याने प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.

त्या प्रामुख्याने एका उमेदवारी नाकारलेल्या इच्छुक उमेदवाराच्या समर्थकांनी भाजपाचा निषेध नोंदवत, भाजपा शहर कार्यालयासमोरील पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांच्या पोस्टरवरील छायाचित्राला काळे फासण्याची घटना घडली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपाच्या कार्यालयासमोरच या नाराज इच्छुकांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

तर नाराज भाजपा कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे जंगली महाराज रस्ता पक्ष कार्यालयासमोर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलक कार्यकर्त्यांनी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपामध्ये पैसे खाऊन उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. तर अनेक महिला उमेदवारांना एबी फॉर्म देऊनही ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याने भाजपा कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत.

तर प्रभाग क्रमांक १२ मधून भाजपाचे तब्बल ४० वर्षे काम करत असल्याचा दावा करणारे, जगन्नाथ कुलकर्णी यांनी त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना कुलकर्णी यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष यादी जाहीर झाल्यानंतर, त्यात कुलकर्णींचे नाव नसल्याचे निदर्शनास येताच, कुलकर्णी यांनी त्यांच्या ज्येष्ठ आई, पत्नी, मुलीसह सहकुटुंब बंडाचे निशाण फडकावत पक्ष कार्यालयासमोर गांधीवादी पद्धतीने आमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की, लोकसभेला अनिल शिरोळे, विधानसभेला मेधा कुलकर्णी यांना आम्ही लीड दिला. मात्र पक्षाने प्रत्यक्ष तिकीट देण्याची वेळ आल्यानंतर बाहेरून आलेल्यांना चोरीच्या मार्गाने उमेदवारी दिल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. तर आमचे तिकीट का कापले हे पदाधिकाऱ्यांनी सांगावे, असे म्हणत शहर अध्यक्ष गोगावले यांच्यावर कुलकर्णी यांनी निशाणा साधला. अगोदरच आम्हाला विश्वासात घेऊन सांगितले असते, तर आम्ही उपोषण केले नसते. पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी काम केले असते. मात्र गेली ४० वर्षे भाजपा बरोबर एकनिष्ठ राहूनही कार्यकर्त्यांसाठी हेच का अच्छे दिन, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर आपल्या उपोषणाला अनेकांनी पाठींबा दिला असून, काही नाराज फोन करून पाठींबा देत आहेत, असे देखील कुलकर्णी यांनी सांगितले.

एकूणच अनेक निष्ठावंतांना डावलून, नव्याने दाखल झालेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. त्मात्र त्याचवेळी निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी दिली असल्याचे पक्षाकडून वारंवार सांगितले जाते आहे. त्यामुळे बंडाचे निशाण फडकवलेल्या नाराजांना भाजपा कसे शांत करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर त्याचवेळी या नाराजीचा भाजपा’ला फटका देखील बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मात्र मंगळवार (दि.७) फेब्रुवारी’ला याचे अधिक चित्र स्पष्ट होईल असे मत राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मरोळ नाका परिसरातील इमारतील आग, दोन बालकांसह चार ठार

News Desk

भाजपच्या ३ प्रवक्त्यांना माध्यमांसमोर बोलण्यास बंदी

Gauri Tilekar

‘कंत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे बजेट’, अर्थसंकल्पावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Manasi Devkar